विमानात जशा हवाई सुंदरी सस्मितपणे प्रवाशांचे स्वागत करतात तसेच आता भारतीय रेल्वेमध्ये रेल्वेसुंदरी प्रवाशांचे स्वागत गुलाबाचे फूल देऊन करतील. हे काही स्वप्न वगैरे नाही. रेल्वेने चांगली सेवा देण्याच्या उपक्रमात हा निर्णय घेतला आहे. दिल्ली-आग्रा दरम्यान गतिमान एक्सप्रेस लवकरच सुरू होत असून तिचा वेग ताशी १६० कि.मी राहील. या गाडीत रेल्वे सुंदरी असतील.
पुढील महिन्यात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार असून या गाडीची वैशिष्टय़े २५ फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केली जाणार आहेत. या गाडीत जीपीएस आधारित माहिती यंत्रणा, सरकते दरवाजे, टीव्ही सेवा असेल. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गतिमान एक्स्प्रेसमध्ये सर्वात चांगली सेवा दिली जाईल. विमानात हवाई सुंदरी असतात त्याच पद्धतीने या गाडीत रेल्वे सुंदरी स्वागत करतील. या गाडीचे भाडे शताब्दी एक्सप्रेसच्या २५ टक्के जास्त असणार आहे. त्यामुळे खानपान सेवाही उत्तम असेल. भारतीय व काँटिनेंटल खाद्यपदार्थ त्यात दिले जातील. उपमा, मिनी डोसा, कांजीवरम इडली, ताजी फळे, आलू कुलचा स्वीस रोल, रोस्टेड ड्राय फ्रूट, चिकन रोल, चिकन सॉसेज, स्पॅनिश एग, व्हाइट ऑम्लेट, डेट वॉलनट स्लाइस केक हे पदार्थ चायनीज क्रोकरीतून दिले जातील.
दिल्ली-आग्रा शताब्दी एक्सप्रेसचे भाडे चेअर कारला ५४० रुपये तर एक्झिक्युटिव्ह वर्गासाठी १०४० रुपये असेल. शताब्दी १२० मिनिटात दोनशे किलोमीटर अंतर कापते तर गतिमान एक्सप्रेस ते अंतर १०५ मिनिटांत पूर्ण करील. कानपूर-दिल्ली, चंडीगड-दिल्ली, हैदराबाद-चेन्नई, नागपूर-विलासपूर, गोवा-मुंबई, नागपूर-सिकंदराबाद या मार्गांवर अशा गाडय़ा सुरू होणार आहेत.