High Court ट्रान्सजेंडर महिलेलाही पती विरोधात कलम ४९८ च्या अन्वये घरगुती हिंसाचार, क्रौर्य या संदर्भातली तक्रार करता येण्याचा अधिकार आहे असा महत्त्वाचा निर्णय आंध्र पद्रेश उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती वेंकट ज्योतिर्मई प्रताप यांनी एका महत्त्वाच्या खटल्यात हा निर्णय दिला आहे. या खटल्यात एका माणसावर आणि त्याच्या कुटुंबावर ट्रान्सजेंडर महिलेने (पार लिंगी) घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. ही महिला सुरुवातीला पुरुष होती ती लिंगबदल शस्त्रक्रिया करुन ती ट्रान्सजेंडर महिला झाली. तिच्यासंदर्भातल्या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
न्यायाधीश काय म्हणाले?
आंध्र प्रदेश न्यायालय हे स्पष्ट करु इच्छितं की ट्रान्सजेंडर महिलाही कलम ४९८ अ च्या अंतर्गत तक्रार करु शकते. या महिलेने घरगुती हिंसाचाराची तक्रार केल्यानंतर तिच्या पतीच्या बाजूने हा दावा करण्यात आला होता की जिच्याशी लग्न झालं आहे ती ट्रान्स महिला आहे. ती ४९८ अ च्या द्वारे तक्रार करु शकत नाही. कारण तिला स्त्री मानताच येणार नाही. मात्र न्यायालयाने हे मान्य केलं नाही. ट्रान्स महिला ही मुलांना जन्म देऊ शकत नाही या एका कारणासाठी तिला स्त्री न समजणं हे सदोष आहे आणि कायदेशीरदृष्ट्या चुकीचंही आहे. त्यामुळे त्या महिलेलाही ४९८ अ द्वारे तक्रार करण्याचा अधिकार आहे. न्यायालयाने हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचंही उदाहरण दिलं.
पतीला पत्नी ट्रान्स वुमन आहे याची कल्पना होती-कोर्ट
न्यायालयाने हेदेखील म्हटलं आहे की ट्रान्स महिलेच्या पतीला आणि त्याच्या कुटुंबाला ही पूर्ण कल्पना होती की सदर महिला ही ट्रान्स महिला आहे. तो आधी तिच्यावर प्रेम करत होता. दोघानी आर्य समाज मंदिरात लग्नही केलं. सगळं ठाऊक असूनही जर सदर महिलेवर अन्याय झाला असेल तर तिला ४९८ अ कलमाद्वारे सुरक्षा पुरवली गेली पाहिजे. Bar & Bench ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.