उत्तराखंड पर्यटन विभागाने आता जास्तीत जास्त पर्यटकांना जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाकडे आकर्षित करण्यासाठी नवीन कल्पना अंमलात आणण्याचे ठरवले आहे. या राष्ट्रीय उद्यानामध्ये ‘मोदी ट्रेल’ विकसित केला जाणार आहे. उत्तराखंड पर्यटन विभागाने यासंदर्भात मंगळवारी संध्याकाळी घोषणा केली असून लवकरच या संदर्भातील काम पूर्ण करणयात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमातील विशेष भागामध्ये साहसवीर बेअर ग्रिल्सबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वाटेने गेले तो मार्ग ट्रेकिंगसाठी ‘मोदी ट्रेल’ नावाने विकसित केला जाणार आहे. त्यामुळे आता पर्यटकांनाही मोदींप्रमाणे या जंगलाचा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ अनुभव घेता येणार आहे. हा कार्यक्रम सोमवारी (१२ ऑगस्ट रोजी) प्रदर्शित झाला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेअर ग्रिल्स ज्या मार्गाने जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामध्ये गेले तो मार्ग ‘मोदी ट्रेल’ नावाने विकसित केला जाणार आहे. राष्ट्रीय उद्यानामध्ये भटकंतीसाठी येणाऱ्यांना या मार्गाने जाण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या ट्रेलची वेगळी जाहिरात आणि प्रसिद्धीही केली जाणार आहे,” अशी माहिती उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सत्यपाल महाराज यांनी दिली.

“जंगलामधील भटकंतीदरम्यान पंतप्रधान मोदींनी साहस आणि शौर्य दाखवले. मोदी ज्या मार्गाने गेले तो ट्रेकिंगचा मार्ग योग्य पद्धतीने विकसित केल्यास उद्यानाकडे अधिक पर्यटकांना आकर्षित करण्यास मदत होईल. पर्यटकांनाही मोदी ट्रेलवरुन भटकंती करायला आवडेल. वाघांसाठी आधीच जगप्रसिद्ध असलेल्या या राष्ट्रीय उद्यानाला या मोदी ट्रेलचा नक्कीच फायदा होईल,” असा विश्वास महाराज यांनी व्यक्त केला.

महाराज यांच्या व्यतिरिक्त उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनीही ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमात सहभागी होऊन राष्ट्रीय उद्यानामध्ये भटकंतीचे साहस दाखवणाऱ्या पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. “मोदींचा सहभाग असलेला हा कार्यक्रम १५० हून अधिक देशांमधील लोकांनी पाहिला. त्यामुळे या उद्यानाची माहिती या देशांमध्ये पोहचली आहे. याचा नक्कीच या उद्यानाला फायदा होईल. या कार्यक्रमानंतर उद्यानात येणाऱ्या भारतीय तसेच परदेशी पर्यटकांची संख्या वाढेल. त्याचा येथील स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी फायदा होईल,” असं मत मुख्यमंत्री रावत यांनी व्यक्त केलं आहे.