ए.आर.रहमान यांचे जय हो घुमणार
कर्नाटक संगीतातील ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांचा भारताच्या सत्तराव्या स्वातंत्र्य दिनी ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर.रहमान यांच्या मैफलीने सन्मान करण्यात येणार आहे. सुब्बलक्ष्मी यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली वाहण्यात येणार असून त्यानिमित्त भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी दूतावासाने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. ए.आर. रहमान यांचे जय हो संयुक्त राष्ट्रांत घुमणार असून ती सुब्बलक्ष्मी यांना आदरांजली असेल, असे संयुक्त राष्ट्रातील दूत सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले. त्या निमित्त १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. सुब्बलक्ष्मी यांच्यानंतर संयुक्त राष्ट्रांत संगीत कार्यक्रम करणारे रहमान हे दुसरे भारतीय आहेत. सुब्बलक्ष्मी यांनी पन्नास वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रांत कार्यक्रम केला होता. त्यांच्या अदाकारीतून रहमान हे भारतरत्न सुब्बलक्ष्मी यांना आदरांजली वाहतील. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभा सभागृहात कार्यक्रम होणार असून त्याला चेन्नईच्या शंकर नेत्रालयाची मदत आहे. सुब्बलक्ष्मी यांनी तेव्हाचे संयुक्त राष्ट्र सरचिटणीस उ थांट यांच्या निमंत्रणावरून १९६६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात कार्यक्रम केला होता. भारतीय दूतावासात ध्वजारोहण होणार असून नसदाक या टाइम्स स्क्वेअरमधील शेअर बाजारात प्रथेप्रमाणे भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे. त्यात महावाणिज्यदूत रिवा गांगुली सहभागी असणार आहेत. मॅनहटन येथील संचलनात २१ ऑगस्ट रोजी योगगुरू बाबा रामदेव व अभिनेता अभिषेक बच्चन नेतृत्व करणार आहेत. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स ऑफ न्यूयॉर्क, न्यूजर्सी व कनेक्टीकट यांनी हे संचलन आयोजित केले आहे. अमेरिकेतील हे सर्वात मोठे संचलन असते. शंकर नेत्रालय २ ऑक्टोबरला सुधा रघुनाथ व त्यांचा चमू संगीत कार्यक्रम संयुक्त राष्ट्रात करणार असून झुबीन मेहता, अनुष्का शंकर यांचेही संगीत कार्यक्रम होतील. कर्नाटकी संगीतकार सुधा रघुनाथन यांचे कार्यक्रम पुढील महिन्यात वॉशिंग्टनस डल्लस, अॅटलांटा, लॉसएंजल्स येथे होणार आहेत. अमेरिकेतील एका विद्यापीठात सुब्बलक्ष्मी यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येईल, असे शंकर नेत्रालय ट्रस्टचे एस.व्ही.आचार्य यांनी सांगितले.