मुख्यमंत्री म्हटल्यावर त्याच्या मालकीचे एक घर, गाडी आणि आणखी काही संपत्ती असेल असा आपला समज होतो. पण एका मुख्यमंत्र्यांच्या नावावर केवळ २.५ लाख रुपयांची संपत्ती आहे. हे मुख्यमंत्री देशातील सर्वात गरिब आणि चांगल्या प्रतिमेचे मुख्यमंत्री आहेत. आता ते कोणत्या राज्याचे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे आहेत ते मुख्यमंत्री. निवडणूकीदरम्यान देण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रात ही गोष्ट लिहीली आहे.

माणिक सरकार यांच्या बँक अकाऊंटमध्ये आता केवळ ९,७२० रुपये असून त्यांच्याकडे १०८० रुपये रोख आहेत. याशिवाय त्यांच्या मालकीचे ४३२ स्क्वेअरमीटरचे एक लहान घर आहे, ज्याची किंमत २० लाख आहे. तर त्यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य यांच्या नावावर त्यांच्याहून जास्त संपत्ती आहे. २४ लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट, २० ग्रॅम सोने आणि २२ हजार रुपये कॅश अशी संपत्ती आहे. त्या केंद्र सरकारमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होत्या. तिथून निवृत्त झाल्यावर त्यांना ही संपत्ती मिावी आहे.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरेतील जनतेला भाजपा सरकारला निवडून देण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्यावर हल्ला करताना त्यांनी राज्यातील जनतेने चुकीचा ‘माणिक’ परिधान केला असून यामुळे विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. राज्याला आता ‘माणिक’ ऐवजी ‘हिऱ्या’ची गरज आहे, असल्याचे म्हटले होते. हिऱ्याचा अर्थ एच म्हणजे हायवे, आय म्हणजे आयवे, आर म्हणजे रेल्वे आणि ए चा अर्थ एअरवे, असल्याचेही त्यांनी म्हटले.