नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरला स्वयंनिर्णयाचा अधिकार असल्याचा आक्षेपार्ह मुद्दा ‘द्रमुक’चे खासदार महम्मद अब्दुल्ला यांनी सोमवारी राज्यसभेत उपस्थित करून काँग्रेससह ‘इंडिया’च्या घटक पक्षांची कोंडी केली. अखेर अब्दुल्ला यांच्या विधानाशी काँग्रेस सहमत नसल्याचे स्पष्टीकरण खासदार व पक्षाचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांना द्यावे लागले.

तमिळनाडूतील ज्येष्ठ समाजसुधारक पेरियार यांचे हे विधान अब्दुल्ला यांनी राज्यसभेत जसेच्या तसे उद्धृत केले. त्याला सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी तसेच, सभापती जगदीश धनखड यांनी तीव्र आक्षेप घेतला. ‘अब्दुल्ला यांचे विधान संविधानविरोधी, देशाच्या अखंडतेलाच नव्हे तर, देशाच्या अस्तित्वाला आव्हान देणारे असून अशी आक्षेपार्ह विधाने खपवून घेतली जाणार नाहीत’, असे संतप्त मत व्यक्त करत धनखड यांनी अब्दुल्लांचे भाषण तात्काळ थांबवले.

हेही वाचा >>> ‘अनुच्छेद ३७०’ रद्दच, मात्र निवडणुका घ्या! सर्वोच्च न्यायालयाचा जम्मू-काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णय

राज्यसभेत सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जम्मू आणि काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक व जम्मू आणि काश्मीर फेररचना विधेयक अशी दोन विधेयके मांडली. या विधेयकांवरील चर्चेदरम्यान द्रमुकचे खासदार मोहम्मद अब्दुल्ला यांच्या विधानामुळे सभागृहात गदारोळ झाला. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, ‘तुम्ही संपूर्ण इंडिया महाआघाडीच्या वतीने ही भूमिका मांडत आहात की, फक्त द्रमुकची भूमिका मांडत आहात’, असा प्रतिप्रश्न करून तिरुची शिवा यांची पंचाईत केली. त्यावर, ‘आम्ही संविधान मानतो. देशाच्या अखंडतेला बाधा निर्माण करण्याचा द्रमुकचा कोणचीही प्रयत्न नाही’, असे शिवा म्हणाले.

हेही वाचा >>> “कलम ३७० रद्द करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय घटनाबाह्य”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

काँग्रेस कचाटयात

सभागृहाचे नेते व केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. द्रमुक खासदाराच्या भूमिकेशी काँग्रेस पाठिंबा आहे का, याचे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेत्यांनी द्यावे, अशी मागणी गोयल यांनी केली. त्यावर, खरगेंनी कोणतेही थेट उत्तर दिले नाही. ‘अब्दुल्ला यांचे म्हणणे घटनाबाह्य वा नियमबाह्य असेल तर कामकाजातून काढून टाकावे पण, त्यांना बोलू न देणे योग्य नव्हे. अब्दुल्लांच्या म्हणण्यावर तुमचे चाणक्य (अमित शहा) उत्तर देण्यास समर्थ आहेत’, असा टोमणा खरगे यांनी मारला. त्यानंतरही भाजपच्या सदस्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल चालू ठेवला. त्यामुळे नाइलाजाने काँग्रेसचे जयराम रमेश यांनी, अब्दुल्ला यांच्या भूमिकेशी सहमत नाही, असे स्पष्टीकरण दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

द्रमुकची पंचाईत

द्रमुकचे गटनेते तिरुची शिवा यांनी पक्षाची बाजू कशीबशी सावरण्याचा प्रयत्न केला. पण,‘अब्दुल्ला यांच्या सामान्य विधानाचा बाऊ केला जात आहे. ‘इंडिया’ महाआघाडी सत्तेवर आल्यावर तिने अनुच्छेद ३७० पुन्हा बहाल केले तर..’, असा मुद्दा शिवा यांनी उपस्थित केल्यामुळे भाजपच्या हाती कोलित मिळाले.