‘टीआरएस’मध्ये विलीनीकरणाची १२ आमदारांची मागणी
लोकसभा निवडणुकीतील अपयशाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसला गुरुवारी तेलंगणमध्ये मोठा धक्का बसला. तेलंगण काँग्रेस विधिमंडळ पक्ष सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीत (टीआरएस)विलीन करावा, अशी मागणी काँग्रेसच्या १८ पैकी १२ आमदारांनी केली.
काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष पोचराम श्रीनिवास रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना विलीनीकरणासंदर्भात निवेदन दिले. मार्चच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या ११ आमदारांनी पक्षांतराचे संकेत दिले होते. गुरुवारी आमदार रोहित रेड्डी हेही त्यांच्याबरोबर आले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तेलंगण प्रदेश काँग्रेस अध्यक्ष एन. उत्तम कुमार रेड्डी हे नळगोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांनी बुधवारी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे ११९ सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ १८ वर आले. त्यातील १२ आमदारांच्या पक्षांतराच्या पवित्र्यामुळे कँग्रेसची कोंडी झाली आहे.
‘‘हे सारे बेकायदा आहे. तेलंगण राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे जनादेशाशी प्रतारणा करत आहेत,’’अशी प्रतिक्रिया उत्तम कुमार रेड्डी यांनी दिली. पक्षांतर करणाऱ्या आमदारांच्या कृतीनंतर त्यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते एम. भट्टी विक्रमार्क आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह विधानसभेच्या आवारात निदर्शने केली.
दरम्यान, १२ आमदारांनी ‘राज्याच्या विकासासाठी’ मुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याचे ठरविले आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार गंडरा वेंकटरमण रेड्डी यांनी पत्रकारांना सांगितले. आम्ही काँग्रेस विधिमंडळ पक्षाची विशेष बैठक घेतली. सर्व बाराही सदस्यांचा मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेतृत्वाला पाठिंबा असून या सर्वानी त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही विधानसभा अध्यक्षांना निवेदन दिले असून, आमचे टीआरएस पक्षात विलीनीकरण करण्याची त्यांना विनंती केली आहे, असे रेड्डी म्हणाले.
पंजाबसह अनेक राज्यांत काँग्रेसमध्ये मतभेद
लोकसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यांत काँग्रेस नेत्यांमधील मतभेद उघड झाले आहेत. पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर टीकास्त्र सोडत मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवली. विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना हरियाणामध्ये माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुड्डा यांच्या समर्थक आमदारांनी प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांच्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. गुजरातमधील काही कँाग्रेस आमदारही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.