पीटीआय, न्यूयॉर्क
भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबविल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी केला. ‘मी सात युद्धांवर तोडगा काढला. मी पाकिस्तान आणि भारतासह अनेक युद्धे थांबवली. परंतु यातही कांगो आणि रवांडामधील मोठे युद्ध असह्य होते, जे मी सोडवले. गेली ३१ वर्षे हे युद्ध सुरू होते. त्यात लाखो लोक मारले गेले. मी न सुटणारी युद्धे सोडवतो,’ असा दावा ट्रम्प यांनी केला.
दूरचित्रवाणीवरील ‘फॉक्स अँड फ्रेन्ड्स’ला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, की ‘पाहा, भारत त्यांचा (रशिया) सर्वांत मोठा ग्राहक होता. मी भारतावर ५० टक्के आयातशुल्क लावले, कारण ते रशियाकडून तेल खरेदी करत आहेत. हा निर्णय घेणे सोपे नाही, हे खूप मोठे काम आहे. परंतु यामुळेच भारताबरोबर आमचे मतभेद निर्माण होतात.’
मुलाखतीत ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात आतापर्यंत ७ देशांमधील संघर्ष सोडवल्याचा दावाही पुन्हा केला. दरम्यान, रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीचे समर्थन करताना, ‘ही खरेदी राष्ट्रीय हित आणि बाजारपेठेतील गतिमानतेवर अवलंबून आहे’, असे भारताने यापूर्वीच म्हटले आहे.