गेल्या दोन दिवसांपासून नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदी चर्चेचा विषय ठरली आहे. या बंदीविरोधात नेपाळमधील Gen Z मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. अखेर १९ तास बंदी अंमलात आल्यानंतर सरकारने ती उठवली. पण असाच काहीसा प्रकार तुर्कियेमध्येदेखील पाहायला मिळत आहे. तुर्कियेच्या सरकारने तात्पुरत्या स्वरूपात अनेक सोशल मीडिया साईट्स बंद केल्या आहेत. यात इन्स्टाग्राम, एक्स, यूट्यूब, व्हॉट्सअॅप या लोकप्रिय पर्यायांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर तुर्कियेमध्येदेखील नेपाळप्रमाणेच सरकारविरोधात नाराजी दिसू लागली आहे.
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी तुर्कियेमध्ये एक्स, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसारख्या अनेक सोशल मीडिया साईट्स बंद झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यापाठोपाठ तब्बल १२ तास तुर्कियेमधील इंटरनेट ठप्प झाल्याचा अनुभव नागरिकांना आला. विशेष म्हणजे या सोशल मीडिया साईट्स किंवा इंटरनेट बंद करत असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा न करताच तुर्किये सरकारने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
नेपाळमध्ये बंदीनंतर आंदोलन, तुर्कियेमध्ये आंदोलनानंतर बंदी!
दरम्यान, नेपाळच्या अगदी उलट परिस्थितीमध्ये तुर्कियेमध्ये सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्यात आली आहे. पोलीस व आंदोलकांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर तुर्किये सरकारने हा निर्णय घेतला आहे. तुर्कियेमधील रिपब्लिकन पीपल्स पार्टी अर्थात CHP च्या मुख्यालयाची जबाबदारी सांभाळण्यासाठी सरकारने गुरसेल टेकिन यांची ट्रस्टी म्हणून नियुक्ती केली. मात्र, पक्षाच्या समर्थकांचा टेकिन यांना तीव्र विरोध आहे. या पार्श्वभूमीवर टेकिन यांना मुख्यालयात पदभार स्वीकारण्यापासून रोखण्यासाठी समर्थकांनी मुख्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले. गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन चालू आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये याच पदावर नियुक्त झालेल्या ओझगर सेलिक यांच्याजागी टेकिन पदभार स्वीकारणार आहेत.
मात्र, एकीकडे दोन्ही बाजूंमध्ये तोडगा काढण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या झडत असताना त्याचवेळी तुर्किये सरकारने अचानक इंटरनेट आणि सोशल मीडिया बंद करण्याचं पाऊल उचलल्यामुळे आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. सोमवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून या सर्व घडामोडींना वेग आला. देशभरातील अनेक भागातून नागरिकांनी या सुविधांचा वापर करता येत नसल्याच्या तक्रारी केल्या.
बंदी कधीपर्यंत अस्तित्वात राहणार?
दरम्यान, तुर्कियेमधील इंटरनेट सुविधा १२ तासांमध्ये पूर्ववत झाली असली, तरी सोशल मीडिया मात्र अद्याप बंदच असून त्यासंदर्भात सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, ही बंदी तात्पुरती असल्याचं सांगितलं जात आहे.