काश्मीर मुद्द्यावरुन पाकिस्तानला पाठिंबा देणं टर्कीला पुन्हा एकदा महागात पडलं आहे. काश्मीर संदर्भात केलेल्या विधानावरुन भारताने टर्कीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. टर्कीने संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या ७६व्या सत्रात काश्मीरचा उल्लेख केला होता. त्यावरून भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिले. टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत आपल्या भाषणात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला, त्यानंतर लगेचच प्रत्युत्तर म्हणून भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्वीट केले आणि सायप्रसच्या मुद्द्यावरून टर्कीला घेरले. टर्की अनेकदा सायप्रसच्या समस्येपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या सायप्रयच्या निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली, ज्यात त्यांनी सायप्रसच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे पालन करण्याच्या गरजेवर भर दिला. जयशंकर यांनी बुधवारी क्रिस्टोडोलाइड्ससोबतच्या भेटीबद्दल ट्विट केले.

“आम्ही आर्थिक संबंध पुढे नेण्यावर काम करत आहोत. मी त्यांच्या प्रादेशिक अंतर्दृष्टीचे कौतुक केले. प्रत्येकाने सायप्रससंदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे पालन केले पाहिजे,” असे जयशंकर यांनी म्हटले आहे.

टर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना काश्मीरचा उल्लेख केल्याच्या काही तासांनंतरच जयशंकर यांनी ट्विट केले आहे. अशा परिस्थितीत टर्कीने काश्मीरचा उल्लेख केल्यावर भारताने पलटवार केल्याचे म्हटले जात आहे. “आमचा विश्वास आहे की काश्मीरसंबंधी ७४ वर्ष जुनी समस्या दोन्ही बाजूंनी संवाद आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावांद्वारे सोडवली पाहिजे,” असे एर्दोगन यांनी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण चर्चेत आपल्या भाषणात सांगितले होते. गेल्या वर्षी देखील, एर्दोआन यांनी जम्मू-काश्मीरबाबत उल्लेख केला होता. भारताने त्या वेळी एर्दोगान यांना खडे बोल सुनावले होते तसेच भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करु नका असेही बजावले होते.

काय आहे सायप्रस विवाद?

सायप्रसमध्ये दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाची सुरुवात १९७४ मध्ये ग्रीक सरकारच्या पाठीशी असलेल्या लष्करी बंडामुळे झाली. यानंतर टर्कीने ग्रीसच्या उत्तर भागावर आक्रमण केले. सायप्रसवर टर्कीने बेकायदेशीरपणे ताबा मिळवलेला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार भारताने हे प्रकरण शांततेने सोडवण्याची बाजू मांडली आहे.

टर्कीने अनेकदा काश्मीरसह अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. सौदी अरेबियाने या मुद्द्यांवरुन तटस्थ भूमिका घेतली आहे, पण टर्की मुस्लीमांच्या नावाखाली गेली काही वर्षे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत आहे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानचे संबंध एकीकडे सौदी अरेबियाशी कमकुवत झाले आहेत, तर दुसरीकडे टर्कीबरोबर सुधारले आहेत. त्यामुळेच टर्की काश्मीरच्या मुद्द्यावर अनेकदा टिप्पणी करताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.