जम्मू-काश्मीरसह सीमावरती भागातील दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारतीय जवानांकडून सातत्याने धडाकेबाज कारवाया सुरू आहेत. यामध्ये काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या दहशतवादी संघटनांमधील दहशतवादी ठार होत आहेत.

या वर्षी काश्मीरमध्ये झालेल्या ११ चकमकीत ८ कट्टर पाकिस्तानी दहशतवाद्यांसह २१ दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याने भरतीचे प्रमाण कमी होईल आणि काश्मीर खोऱ्यातील शांतता आणि विकासाला चालना मिळेल. असं काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले आहे.

आजच जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी अतिरेक्यांनी एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या केली होती.

या चकमकीसंदर्भात माहिती देताना काश्मीर पोलिसांचे आयजी म्हणाले की, “गेल्या १२ तासांत दोन चकमकीत पाकिस्तान प्रायोजित प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे ५ दहशतवादी मारले गेले. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा कमांडर दहशतवादी जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे.”