नेपाळ सीमेवरून बेकायदेशीररीत्या भारतात घुसलेल्या दोन चीनी नागरीकांना एसएसबीच्या जवानांनी अटक केली. गेले १५ दिवस ते बेकायदेशीररित्या भारतात फिरत होते. चौकशीदरम्यान दोघेही सीतामढीमार्गे भारतात दाखल झाले आणि खासगी कारने दिल्लीला गेल्याचे समोर आले आहे. १५ दिवस दिल्लीत फिरून ते नेपाळला परतत होते. यादरम्यान सीमेवर गस्त घालणाऱ्या एसएसबीच्या जवानांनी दोघांनाही अटक केली. एसएसबीच्या जवानांनी दोघांना बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
३० वर्षीय लू लांग आणि ३२ वर्षीय यूआन हेलांग अशी अटक करण्यात आलेल्या नागरिकांची नावे आहेत. आर्थिक फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. दोन्ही तरुणांकडे नेपाळला गेलेल्या व्हिसा क्रमांक EA5390986 आणि BA9887948 व्यतिरिक्त एक काळे कापड, दोन मोबाईल, मोबाईल पॉवर बँक, विविध कंपन्यांचे अर्धा डझन भारतीय सिम, १०३ डॉलर, पाचशे भारतीय चलन, एटीएम कार्ड, सिगारेट, औषध आणि इकॉनॉमी क्लासचा बोर्डिंग. पास आढळून आला आहे.
कसे पोहचले भारतात?
दोन्ही तरुणांनी पोलीस चौकशीत सांगितले की, “ते चीनमधून थायलंडमार्गे काठमांडूला पोहोचले. तेथून ते सायकलने भिथामोड सीमेपर्यंत गेले. भारतीय हद्दीत आल्यानंतर त्यांनी २५ मे रोजी नोएडा येथील जेपी ग्रीन नावाच्या ठिकाणी भाड्याने कार घेतली. दोघे त्यांची दिल्लीतील मैत्रिणी कॅरीकडे गेले. त्यांची मैत्रीण कॅरी नोएडामध्ये मोबाईल फॅक्टरीसह टोन सांग रेन जियान नावाचा गाण्याचा क्लब देखील चालवते. तेथे १५ दिवस राहिल्यानंतर, कारने भिट्टामोरला परत आले.
पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर संतोष ठाकूर नावाच्या माणसाकडून त्यांनी कार घेल्याचे समोर आले आहे. पोलीस सध्या संतोषचा शोध घेत आहेत. एसएसबीने पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जात दोन्ही चिनी तरुणांवर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एसएचओ नवलेश कुमार आझाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीनंतर दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.