छत्तीसगढमधील बिजापूर जिल्ह्यात दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात सुरक्षारक्षकांना मंगळवारी यश आले. अटक केलेल्या दोघांपैकी एकावर राज्य सरकारने बक्षिसही जाहीर केले होते. काडती सान्नू आणि हेमला सोमलू अशी या दोघांची नावे आहेत.
गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुर्जी गावातून स्थानिक पोलीसांनी या दोन्ही नक्षलवाद्यांना सोमवारी रात्री ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले. पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आल्याचे लक्षात येताच दोघांनीही गावाजवळून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. दोघांनीही नक्षलवादी चळवळीत सक्रीय असल्याची कबुली पोलीसांकडे दिली आहे.