माजी हवाईदल प्रमुख एस.पी.त्यागी व गौतम खेतान यांचे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतील दलाली प्रकरणात सीबीआयने जाबजबाब घेतले. इटलीच्या न्यायालयाने या प्रकरणात दलाली दिली गेल्याचे म्हटले असून त्यात त्यागी यांच्यासह तेरा जणांची नावे आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर्स खरेदीचा करार हा ३६०० कोटी रुपयांचा होता. सीबीआय सूत्रांनी सांगितले, की त्यागी व खेतान हे चौकशी पथकासमोर बुधवारी हजर झाले. त्यागी यांच्यावर लागोपाठ तिसऱ्या दिवशी प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली असून खेतान हे मिलान येथील अपील न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर प्रथमच चौकशीसाठी हजर झाले होते. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर्स खरेदी प्रकरणात लाच दिली गेली होती, हे इटलीच्या न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर स्पष्ट झाले असून या प्रकरणात चौकशीस बोलावण्यात आलेले खेतान हे पेशाने वकील असून ते ज्या मार्गाने दलाली देण्यात आली, त्या एरोमॅट्रिक्स कंपनीच्या संचालक मंडळाचे माजी सदस्य आहेत. सीबीआयच्या आरोपपत्रात त्यांचे नाव आहे. इटालियन मध्यस्थ कालरे गेरोसा व गिडो हॅशके यांच्याशी नेमके काय संबंध होते यावर त्यागी व खेतान यांना प्रश्न विचारण्यात आले. सीबीआयने त्यागी व इतर तेरा जणांवर आरोपपत्र ठेवले असून एका युरोपीय मध्यस्थाचाही त्यात समावेश आहे. त्यागी यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले असून हेलिकॉप्टरची उंची बाबतची क्षमता ६ हजार मीटर वरून ४ हजार मीटर करण्याचा निर्णय व्यक्तिगत नव्हता तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्या सल्लामसलतीने घेतला होता, असे त्यागी यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tyagi statements on augusta case
First published on: 05-05-2016 at 02:13 IST