Uddhav Thackeray : राहुल गांधींनी आज मला जेवणाचं निमंत्रण दिलं आहे मी तिथे जाणार आहे. शिवाय दिल्लीत दरवर्षी मी येत असतोच. इंडिया आघाडीच्या बैठकीतले चर्चेचे विषय काय आहेत ते चर्चा झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन. आमच्या परिने आम्ही चर्चा करत आहोत. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान उद्धव ठाकरेंनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरिफ लागू केलं आहे त्याबाबत प्रश्न विचारला असता त्यावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.
उपराष्ट्रपती नेमके आहेत कुठे?
उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला? तसंच राजीनामा दिल्यानंतर ते आहेत कुठे? यावर चर्चा झाली पाहिजे. प्रत्येक राज्याच्या निवडणुका जेव्हा होत आहेत तेव्हा होणार. बिहारमध्ये मतदार याद्यांचा घोळ झाला त्यात अंतिम निर्णय काय झाला माहीत नाही. पण मतदाराची ओळख त्याने पटवून द्यायची असं काहीतरी ठरल्याचं कळतं आहे. देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का? हा प्रश्न यामुळे निर्माण होतो आहे. सीएए आणि एनआरसीचा विषय गाजला होता तेव्हा आंदोलनं झाली होती. तेव्हाही हाचा मुद्दा होता. आता निवडणूक आयोगाने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे.
व्हीव्हीपॅटही काढणार असाल तर निवडणुका कशाला घेता?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असताना ईव्हीएमवर आमचा आक्षेप असताना आणखी एक अपारदर्शकता आणली आहे की व्हीव्हीपॅट मशीनच काढलं आहे. मग निवडणुका घेताच कशाला? जाहीर करा की आमचे इतके जिंकले. बटण दाबलं जातं आहे, दिवा लागतो आहे, रिसिट दिसते आहे पण रजिस्टर्ड कुठे होते आहे दिसतं आहे. बॅलेट पेपरवर स्पष्ट कळत होतं. आता व्हीव्हीपॅट काढणार असाल तर निवडणुका घेण्याचा फार्स घेता कशाला? असं उद्धव ठाकरे म्हणाले.
गद्दारांच्या मताला मी किंमत देत नाही-उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदेंही दिल्लीत आहेत याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले त्यांच्या कुठल्या वक्तव्यांवर उत्तर देण्याइतके ते महान नाहीत. गद्दार हा गद्दार असतो, त्यामुळे गद्दाराच्या मताला मी किंमत देत नाही. त्यांच्या मालकांना ते भेटायला असतील तर आपण काय बोलणार? असाही टोला उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प रोज आपल्या देशाची खिल्ली उडवत आहेत-ठाकरे
ट्रम्प टॅरिफचा फटका सामान्यांना बसणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाची खिल्ली उडवत आहेत. आपण त्यांना अवाक्षरानेही उत्तर देत नाही. देशाचं सरकार नेमकं चालवतंय कोण? मी माझं मत आधीही व्यक्त केलं आहे आपल्या देशाला पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांची गरज आहे. कारण आत्ताचे पंतप्रधान हे भाजपाचे आहेत. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतरही मोदी बिहारला गेले, पहलगामला नाही. या सरकारकडे परराष्ट्र नीती वगैरे काही नाही, खंबीर धोरण नाही. अमेरिका डोळे वटारत असताना डोवाल रशियाला गेले आहेत. पंतप्रधान चीनला चालले आहेत. चीन बरोबरचे संबंधही त्यांच्या मित्रासाठी दरवाजे उघडतात का? पण हे सगळं होत असलं तरीही परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत हे सरकार सपशेल अपयशी ठरलंय असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.