Uddhav Thackeray : राज ठाकरेही राहुल गांधींच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी येणार का? असं विचारलं असता उद्धव ठाकरेंनी याबाबत उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी राहुल गांधींच्या निवासस्थानी होणाऱ्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी राज ठाकरेही येणार का? हे विचारलं असता उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचं उत्तर दिलंय. तसंच भाजपा आणि मोदींवरही टीका केली आहे.
पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत…
सरकारला कुठलीही नीतीमत्ता राहिलेली नाही. जोपर्यंत दहशतवादी कारवाया पाकिस्तान थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानशी क्रिकेट खेळता कामा नये किंवा कोणतेही संबंध ठेवता कामा नये, असा इशारा शिवसेना प्रमुखांनी दिला होता. सुषमा स्वराज यांनीही अशाच प्रकारचं भाष्य केलं होतं. हे सरकार मतलबाचं बघतात. आपल्याला देशप्रेमाचे धडे देतात आणि जय शाहसह सगळ्या मंत्र्यांची मुलं दुबईला जाऊन भारत पाकिस्तानचे सामने बघतात कारण हे देशभक्त नाहीत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसह कुठलेही संबंध ठेवू नयेत. जो अशा प्रकारे वागणार असेल जो सच्चा देशभक्त आहे. अशीच देशभक्तीची व्याख्या आहे.” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखूनच मी हे सांगतो आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पक्ष फोडायचे, आमदार खासदार फोडायचे इतक्याच गोष्टी भाजपा करते आहे. असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. दरम्यान राज ठाकरे राहुल गांधींच्या निवासस्थानी येणार का? याचंही उत्तर त्यांनी दिलं.
राज ठाकरेंबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?
राज ठाकरे राहुल गांधींच्या निवासस्थानी येणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असता ते म्हणाले, “आम्ही दोघं भाऊ समर्थ आहोत, आम्हाला काय निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ. आम्हाला तिसऱ्या कुणाची आवश्यकता नाही” असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू कऱण्यात आलं होतं त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि मराठीसाठी एकत्र येत त्यांनी ५ जुलैला आंदोलन जाहीर केलं होतं. दरम्यान देवेंद्र फडणवीस सरकारने अधिवेशनापूर्वी त्रिभाषा सूत्रासंदर्भातले दोन्ही शासन निर्णय रद्द करुन एक नवी समिती या विषयावर नेमली. ज्यानंतर ५ जुलैला ठाकरे बंधू २० वर्षांनी विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. स्थानिक स्वराज्य संस्थांचया निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांची युती होईल अशी चर्चा आहे. दरम्यान राज ठाकरेंनी जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केली तर ते इंडिया आघाडीचाही भाग होतील का? या प्रश्नाच्या अनुषंगाने राहुल गांधींच्या घरी ते स्नेहभोजनासाठी येणार का? असा सवाल करण्यात आला. ज्यावर उद्धव ठाकरेंनी आमच्यात तिसऱ्या कुणाची गरज नाही असं म्हटलं आहे.
व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरुन भाजपाला सुनावले खडे बोल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असताना ईव्हीएमवर आमचा आक्षेप असताना आणखी एक अपारदर्शकता आणली आहे की व्हीव्हीपॅट मशीनच काढलं आहे. मग निवडणुका घेताच कशाला? जाहीर करा की आमचे इतके जिंकले. बटण दाबलं जातं आहे, दिवा लागतो आहे, रिसिट दिसते आहे पण रजिस्टर्ड कुठे होते आहे दिसतं आहे. बॅलेट पेपरवर स्पष्ट कळत होतं. आता व्हीव्हीपॅट काढणार असाल तर निवडणुका घेण्याचा फार्स घेता कशाला? असं उद्धव ठाकरे म्हणाले.