पाच राज्यांचे निवडणूक निकाल लागले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली आहे. मध्य प्रदेशमध्ये तर भाजपाने रेकॉर्ड ब्रेक मतं मिळवली आहेत. आता या सगळ्या निकालांवरुन २०२४ ची लोकसभा निवडणूकही भाजपाच जिंकणार असे अंदाजही व्यक्त होत आहेत तसंच भाजपा नेत्यांनीही तसा दावा केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर जोरदार टीका करण्यात आली आहे. तसंच मोदींची गॅरंटी या शब्दाचाही समाचार घेण्यात आला आहे.

काय म्हटलं आहे सामना अग्रलेखात?

पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. २०२४ च्या लोकसभेची सेमी फायनल भाजपाने जिंकली आहे. मात्र सेमी फायनल जिंकणारा फायनल जिंकतोच असे नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फायनल जिंकण्याची गॅरंटी दिली आहे. जो तो आपल्या पद्धतीने पाचही राज्यांमधल्या जय-पराजयाचं विश्लेषण करत आहे. मिझोरम विधानसभा निवडणुकीचाही निकाल लागला आहे. तिथे स्थानिक पक्षांना यश मिळालं आहे. देशाचे किंवा जगाचे नेते असलेले पंतप्रधान मोदी तेलंगणाप्रमाणे मिझोरामही जिंकू शकलेले नाही. देशात सर्वत्र मोदी मॅजिक चाल नाही. अनेक राज्यांतील लोक सुज्ञ आणि विचारी आहेत. त्यामुळेच देशात लोकशाही पूर्णपणे खतम करता आलेली नाही. भारतीय जनता पक्षाने मोदींच्या गॅरंटीवर शिक्कामोर्तब केले तर राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकानवर शुकशुकाट झाल्याचा दावाही भाजपाने केला.

हे गॅरंटी प्रकरण काय आहे?

हे गॅरंटी प्रकरण काय आहे? मोदींनी २०१४ पासून अनेक ‘गॅरंट्या’ दिल्या होत्या. प्रत्येक निवडणुकीत त्यांचे गॅरंटी कार्ड वाढत असते. परदेशातला काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी होती त्याचं काय झालं? भ्रष्टाचाराचं समू उच्चाटन करुन भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची गॅरंटी होती त्याचं काय झालं? काही भ्रष्टाचारी भाजपाने पळवून लावले आणि उरलेले होते त्यांना पक्षात घेऊन मंत्री करण्यात आले.भ्रष्टाचाऱ्यांना भाजपात आणून शुद्ध करायचे ही नवी गॅरंटी आहे. काश्मीरसह देशातला दहशतवाद संपवण्याची गॅरंटी होती. मोदींच्या डोळ्यासमोर पुलवामा, पठाणकोट, उरी घडे. काश्मीरमध्ये रोज जवानांच्या हत्या सुरू आहेत. मणिपुरातील दहशतवादाने कहर केला आहे. काय झाले दहशतवाद संपवण्याच्या गॅरंटीचे?

पेट्रोल ४० रुपये लिटर करण्याची गॅरंटी होती. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची गॅरंटी होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करण्याची गॅरंटी होती. डॉलरच्या तुलनेत रुपया ३०-३५ रुपयांवर आणण्याची गॅरंटी होती. काय झाले तुमच्या गॅरंटीचे? अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याची गॅरंटी होती. मराठा आणि धनगरांना आरक्षण देण्याची गॅरंटी होती. महागाई कमी करुन जनतेला अच्छे दिन दाखवण्याची गॅरंटी होती. या सर्व ‘गॅरेंट्या’ मोदींनीच दिल्या होत्या. त्यातली एकही गॅरंटी पूर्ण झाल्याचं दिसत नाही. तरीही तीन राज्यांत भाजपाचा विजय होतो हीच लोकशाहीची गंमत आहे. कोणतीही गॅरंटी पूर्ण न करता मोदींना विजय मिळतो आणि त्याचा उत्सव साजरा होतो. त्यामुळे या विजयाचे बाप कोण? असा प्रश्न पडतो.

Story img Loader