Heathrow Airport Indian Workers: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात भाषेवरून वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात आता हा भाषेचा वाद इंग्लंडमध्येही दिसू लागला आहे. इंग्लंडमधील हीथ्रो विमानतळावर इंग्रजी न बोलणाऱ्या भारतीय आणि आशियाई कर्मचाऱ्यांना हद्दपार करा, असे म्हणणारी पोस्ट एका महिलेने केली आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे.
सार्वजनिक धोरण तज्ज्ञ असल्याचे सांगणाऱ्या लुसी व्हाईट या ब्रिटीश महिलेने ‘एक्स’वर दावा केला की, हीथ्रो विमानतळावरील बहुतेक कर्मचारी भारतीय किंवा आशियाई आहेत आणि ते “इंग्रजीचा एक शब्दही बोलत नाहीत.”
“आत्ताच लंडनच्या हीथ्रो विमानतळावर उतरले. येथे बहुतेक कर्मचारी भारतीय आणि आशियाई आहेत व ते इंग्रजीचा एक शब्दही बोलत नाहीत”, असे या ब्रिटीश महिलेने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या ब्रिटीश महिलेने पुढे दावा केला आहे की, जेव्हा तिने या कर्मचाऱ्यांना इंग्रजी बोलायला सांगितले, तेव्हा त्यांनी तिच्यावर वंशवादाचा आरोप केला. ही महिला म्हणाली की, “त्यांना माहित आहे की मी बरोबर आहे, म्हणून त्यांना वंशवादाचे कार्ड वापरावे लागेल.”
या महिलेने आक्रमक होत या भारतीय आणि आशियाई कर्मचाऱ्यांना हद्दपार करण्याची मागणी केली आहे. “त्या सर्वांना हद्दपार करा. ते यूकेच्या प्रवेशाच्या ठिकाणी का काम करत आहेत?! पर्यटकांना काय वाटत असेल”, असे या महिलेने तिच्या पोस्टच्या शेवटी म्हटले आहे.
पण सोशल मीडिया युजर्सनी या ब्रिटीश महिलेच्या दाव्यांना प्रत्युत्तर देण्यास वेळ लावला नाही. भाषेच्या अडथळ्यांबद्दलच्या तिच्या चिंतेशी अनेक युजर्स सहमत होते, तर काहींनी तिच्या विधानांना “वर्णद्वेषी” आणि “अज्ञानी” म्हटले.
एका युजरने स्पष्ट विरोधाभास दर्शवत म्हटले की, “ते इंग्रजीचा एक शब्दही बोलत नाहीत, पण तुम्हाला उत्तम प्रकारे समजून घेतात आणि तुम्हाला वंशवादी म्हणतात? त्यांनी तुम्हाला एक काल्पनिक कथाकार देखील म्हणायला हवे होते.”
दुसऱ्या एका युजरने म्हटले, “पाश्चात्य देशांना वांशिक केंद्रीत होण्याची परवानगी नाही. वंशवादी व्हा, किंवा पश्चिमेचा मृत्यू स्वीकारा.”
“ब्रिटिश स्थानिक लोक या नोकऱ्यांसाठी पुढे येत नाहीत, म्हणूनच भारतीय आणि आशियाई लोक तिथे आहेत. हे मान्य करा, ही वस्तुस्थिती आहे”, असे आणखी एक युजर म्हणाला.
या ब्रिटीश महिलेच्या युक्तिवादाला विरोध करताना, एका युजरने एका लांबलचक टिप्पणी केली आणि त्यामध्ये हीथ्रोचे स्थान नैसर्गिकरित्या वैविध्यपूर्ण, बहुभाषिक कामगारांना कसे आकर्षित करते, हे स्पष्ट केले.
या युजरने महिलेला आठवण करून दिली की, ब्रिटनची अर्थव्यवस्था स्थलांतरित कामगारांवर चालते, विशेषतः पर्यटन, लॉजिस्टिक्स आणि आरोग्यसेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये, जिथे वांशिक अल्पसंख्याक अशा नोकऱ्या करतात, ज्या अनेक स्थानिक टाळतात.