Ukraine Drone Attack Russia’s Top Oil Refinery: रशिया आणि युक्रेन यांच्यात २०२२ पासून युद्ध सुरू आहे. साडे तीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले हे युद्ध थांबविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत आहेत. नुकतेच त्यांनी रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घडवून आणणार असल्याचे सांगितले होते. मात्र भूराजकीय घटना वेगाने बदलत असून आता युक्रेनने रशियाच्या मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. रशियाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनच्या लष्कराने शनिवारी रात्री लेनिनग्राड प्रदेशातील किरीशी तेल शुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्पाला लक्ष्य केले. या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे १७.७ दशलक्ष मेट्रिक टन आणि दररोज ३,५५,००० बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते. कच्च्या तेलाच्या उत्पादामध्ये रशियाच्या पहिल्या तीन प्रकल्पात या प्लांटचा समावेश होतो.
लेनिनग्राडचे प्रांतिय गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोझडेन्को यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरिशी परिसरात युक्रेनचे तीन ड्रोन पाडण्यात आले. ड्रोनचे ढिगारे पडल्यानंतर आग लागली. असोशिएटेड प्रेसने (एपी) दिलेल्या बातमीनुसार, या हल्ल्यात कुणीही जखमी झालेले नाही. तसेच आग विझविण्यात यश आले आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रशियाने व्यापलेल्या क्रिमिया आणि अझोव्ह सागरात काल रात्री युक्रेनचे जवळपास ८० ड्रोन पाडण्यात आले आहेत. किरिशी येथे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यात येत असून त्यावर रशियन अधिकाऱ्यांनी थेट भाष्य केलेले नाही.
रशियाची पुरवठा साखली उध्वस्त करण्याचा प्रयत्न
रशियात सध्या इंधन तुटवडा भासत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. रशियातील अनेक पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. रशियाने मागच्या आठवड्यात पेट्रोलची निर्यात स्थगित केली असून ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण बंदी करण्यात येणार आहे. तर ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्यातीवर अंशतः निर्बंद लावले जाणार आहेत.
रशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा निर्यातदार आहे. मात्र अलीकडे युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे पुरवठा साखळीमध्ये व्यत्यय येत आहे. त्यामुळे रशियात टंचाई निर्माण झाली आहे, असे एपी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.