Ukrainian Drones युक्रेन आणि रशिया या दोहोंमधला संघर्ष काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. रशियाच्या एअरबेसवर युक्रेनने ड्रोन हल्ला केला आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे असं मानलं जातं आहे. कीव इंडिपेंडंट ने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं आहे की या हल्ल्यात रशियाची ४० हून अधिक बॉम्बर जेट्स उद्ध्वस्त झाली आहेत. तर AFP ने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी रशियाच्या दोन पुलांवर मोठा हल्ला करण्यात आला आहे ज्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला.
हल्ल्याबाबत नेमकी काय माहिती समोर?
या हल्ल्याबाबत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ला केला आहे. या ड्रोन हल्ल्यानंतर ओलेन्या एअरबेसवर रशियन स्ट्रॅटेजिक बॉम्बर्समध्ये आग लागली. युक्रेनने रशियाच्या एअरबर ०१०६ वर निशाणा साधला आहे. एपीने दिलेल्या वृत्तानुसार मागील तीन वर्षांपासून जो संघर्ष सुरु आहे त्यात युक्रेनने रशियाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ला केला आहे.
युक्रेनच्या अधिकाऱ्याने काय सांगितलं?
युक्रेन सुरक्षा सेवेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की युक्रेनने जो ड्रोन हल्ला केला त्यात रशियाचे मोठे बॉम्बर जेट म्हणजेच Tu 95, Tu 22 आणि A 50 ही विमानं उडवली आहेत. बेलाया या एअरबसवर एक हल्ला झाला आणि त्यानंतर ओलेन्या एअरबेसवरही हल्ला करण्यात आला असं त्यांनी सांगितलं. समोर आलेल्या माहितीनुसार Tu 95 हे १९५० च्या दशकातलं फायटर विमान आहे. अनेक क्रूज मिसाईल वाहून नेण्याची क्षमता या विमानात आहे. त्याच प्रमाणे Tu 22 हे अतिवेगाने हल्ला करण्याठी प्रसिद्ध असलेलं विमान आहे. तर A 50 हे एक दुर्मीळ आणि महागडं फायटर विमान आहे. रशियाकडे अशी १० विमानं आहेत. प्रत्येक विमानाची किंमत ३५० मिलियन डॉलर अशी आहे. रशियाकडून आलेली लढाऊ विमानं युक्रेनवर सातत्याने हल्ला करत असतात. त्यांनी त्यांचे हल्ले कमी करावेत किंवा करुच नयेत म्हणून आम्ही प्रत्युत्तरादाखल ड्रोन हल्ले केले आहेत असं युक्रेनने सांगितलं आहे.