लंडन, कीव्ह : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी सोमवारी वॉशिंग्टन डीसीला जाणार आहेत. व्हाइट हाऊसमध्ये होणाऱ्या झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान युरोपीय महासंघाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि ट्रम्प यांच्या अलास्कातील भेटीनंतर आपण सोमवारी अमेरिकेला जाणार असल्याचे झेलेन्स्की यांनी जाहीर केले होते.

ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या भेटीदरम्यान युरोपीय नेत्यांच्या उपस्थितीबद्दल युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन दर लियेन यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये, व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात जाहीरपणे शाब्दिक खडाजंगी उडाली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून या वेळी खबरदारी घेण्यात येत आली आहे. युक्रेनला युरोपचा पाठिंबा असल्याचेही त्यातून दाखविले जाणार आहे.

झेलेन्स्की यांच्याबरोबर जर्मनीचे चान्सेलर फ्रेडरिश मर्च, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि उर्सुला वॉन दर लियेन हे बैठकीला हजर राहणार आहेत. त्यापूर्वी रविवारी मर्च, माक्राँ आणि स्टार्मर यांनी बैठक घेतली. रशियाबरोबर युद्धसमाप्तीचा करार करण्यासाठी युक्रेनला सुरक्षेची हमी मिळावी आणि त्यासाठी अमेरिकेचीही भूमिका असावी अशी युरोपीय महासंघाची भूमिका आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्याबरोबरच्या चर्चेदरम्यान पुतिन यांनी युद्धसमाप्तीच्या बदल्यात युक्रेनचा काही भूभाग मागितला आहे. तसेच युरोपच्या नेत्यांनी पडद्याआडून काही कृती करू नयेत असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर युरोपीय नेते सतर्क आहेत.

अमेरिकेची भूमिका

पुतिन यांच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी शस्त्रसंधीऐवजी शांतता करार करण्यास सहमती द्यावी असे म्हटले आहे. या मुद्द्यावर ट्रम्प यांनी युक्रेनच्या तुलनेत रशियाला अधिक अनुकूल भूमिका घेतल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर युक्रेनला नाटोचे सदस्यत्व देणे आणि त्याद्वारे नाटो कराराच्या अनुच्छेद ५नुसार युक्रेनला सामूहिक संरक्षण देण्यास अमेरिका राजी आहे. दुसरीकडे, युद्धसमाप्तीनंतर युक्रेनला अधिक सुरक्षेची हमी देण्यासाठी पुतिन यांनीही चर्चेत सहमती दर्शवल्याचे ट्रम्प यांचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी सीएनएनला रविवारी सांगितले.