Ukrainian President Zelenskyy on US tariffs : जगभरातील नेत्यांकडून रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी जगभरातील दिग्गज नेते एकमेकांशी चर्चा करत आहेत. यादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केलेले एक वक्तव्य चर्चेत आले आहे. ज्यामध्ये त्यांनी भारतासह रशियाबरोबर व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांवर टॅरिफ लादण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. यावेळी त्यांनी “राष्ट्राध्यक्ष (ट्रम्प) यांना हे युद्ध संपवायचे आहे,” असे आपल्याला वाटते असेही झेलेन्स्की म्हणाले आहेत.

“माझ्या मते, रशियाबरोबर व्यापार सुरू ठेवणाऱ्या देशांवर टॅरिफ लादण्याची कल्पना योग्य आहे,” एबीसी न्यूजच्या रविवारी प्रक्षेपित झालेल्या मुलाखतीत बोलताना झेलेन्स्की असे म्हणाले आहेत.

भारत आणि अमेरिका यांच्यात टॅरिफच्या आणि रशियन तेल खरेदी या मुद्द्यावर व्यापारी संबंध तणावाचे बनले आहेत. अमेरिकेने वारंवार चिंता व्यक्त केली आहे की रशियन तेल विक्रीतून मिळणारे पैसा हा रशिया युक्रेनमधील युद्धात वापरत आहे. यावर भारताने स्पष्ट केले आहे की त्यांची खरेदी ही आर्थिक आणि व्यावसायिक बाबींवर आधारित आहे.

दुसरीकडे ट्रम्प यांनी सांगितले की युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ते रशियावर दुसऱ्या पातळीवरील आणखी निर्बंध लादण्याची तयारी करत आहेत. मात्र त्यांनी यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असेल याबद्दलचा तपशील दिलेला नाही, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांबद्दल महत्त्वाचे विधान केले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव काहीसा कमी झाला. “दोन्ही देशांदरम्यान विशेष संबंध असून वादाचे असे क्षण उद्भवत असतात, त्यावरून चिंता करण्याचे कारण नाही,” असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ओव्हल ऑफिसमध्ये माध्यमांशी बोलताना, नरेंद्र मोदी हे थोर पंतप्रधान असून ते सदैव आपले मित्र राहतील असेही ट्रम्प म्हणाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांचे मूल्यांकन सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया समाजमाध्यमावर व्यक्त केली.