Uma Bharti : मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं एनआयएच्या विशेष न्यायालयाकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचा निकाल एक हजार पानांहून अधिक पानांचा असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. मालेगावात २९ सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी १७ वर्षांनी निकाल देण्यात आला. यानंतर आता भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उमा भारती बोलत असताना त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
उमा भारती नेमकं काय म्हणाल्या?
आज आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. साध्वी प्रज्ञा नाशिकच्या तुरुंगात होत्या तेव्हा मी त्यांना भेटायला गेले होते. त्यांची माझी भेट झाली तेव्हा मला खूप रडू आलं. मी रडत होते आणि तिने मला शांत केलं. तिच्याबाबत ज्या गोष्टी मी पोलीस अधिकाऱ्याकडून ऐकल्या होत्या त्या मी तिला विचारल्या. ती म्हणाली हो दीदी हे सगळं घडलं आहे माझ्याबरोबर. माझ्या मनाला ते ऐकून प्रचंड यातना झाल्या. आज माझ्या मनाला आंतरिक समाधान मिळालं आहे. पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, राहुल गांधी, काँग्रेसचे नेते, डाव्या विचारांचे नेते यांनी भगवा दहशतवाद हा शब्द रुजवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना चौकात उभं करुन कुठली शिक्षा दिली जाणार? मी याबाबत आवाहन करते आहे असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना उमा भारतींना आजही अश्रू अनावर झाले होते.
न्यायालयाने निकाल देताना नेमकं काय म्हटलंय?
बॉम्बस्फोट झाला, मात्र मोटरसायकलमधे झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आलं. आरडीएक्स प्रसाद पुरोहितने आणले हे सिद्ध होऊ शकलेले नाही. त्याच्याविरुद्धचे आरोप सिद्ध झाले नाहीत. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणाहून वैज्ञानिक पुरावे जमा केले गेले नाहीत. साध्वीच्या मोटरसायकलचा स्फोट झाल्याचा आरोप आहे. पण ही मोटरसायकल तिच्या मालकीची असल्याचे सिद्ध करण्यात अपयश आल्याचे न्यायालयाने आरोपींची सुटका करताना स्पष्ट केलं.
मालेगाव प्रकरणाचा निकाल १७ वर्षांनी
प्रदीर्घ काळानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये विशेष एनआयए न्यायालयाने आरोपींवर दहशतवादाच्या आरोपांतर्गत आरोपनिश्चिती केली आणि खटल्याच्या नियमित सुनावणीला अखेर सुरुवात झाली. सात वर्षांच्या सुनावणीनंतर १९ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादी आणि आरोपींचा युक्तिवाद पूर्ण झाल्याचे जाहीर करून खटल्याचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणी विशेष न्यायालयाने गुरूवारी उपरोक्त निकाल दिला. खटला सुरू असताना प्रकरणातील सगळ्या आरोपींना उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यामुळे, सगळे आरोपी जामिनावर बाहेर होते.