scorecardresearch

‘दहशतवादाविरोधात संयुक्त राष्ट्रांचे ठोस धोरण नाही’ ; भारताकडून आमसभेत चिंतेचा सूर

दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील सर्वच राष्ट्रांना आणि समाजाला दहशतवादाच्या जागतिक संकटाने ग्रासले आहे.

संयुक्त राष्ट्रे : दहशतवादाची नेमकी व्याख्या काय हे सांगण्यास संयुक्त राष्ट्रांना अपयश आले असून या जागतिक संकटाचे निराकरण करणे आणि दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त करणे यासाठी कोणतेही ठोस धोरण संयुक्त राष्ट्रांकडून अद्याप तयार केले गेले नाही, असे सांगत भारताने मंगळवारी आंतरराष्ट्रीय दहशतवादाबाबत चिंता व्यक्त केली.

संयुक्त राष्ट्रांच्या कामांबाबत सरचिटणिसांनी सादर केलेल्या अहवालावर चर्चा करण्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेत भारताच्या स्थायी मंडळाचे द्वितीय सचिव दिनेश सेठिया सहभागी झाले होते. जगभरात दहशतवादी कृत्ये वाढत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. ‘दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील सर्वच राष्ट्रांना आणि समाजाला दहशतवादाच्या जागतिक संकटाने ग्रासले आहे. दहशतवादाला गांभीर्याने घेण्यात आपण असमर्थ ठरलो असून त्यामुळे जगभरातील सामान्य जनतेमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या प्रासंगिकतेवर शंका निर्माण झाली आहे. सामान्य जनांचे संरक्षण करणे हे संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार आपली जबाबदारी आहे,’ असे सेठिया यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्रांनी १९८६मध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद सर्वसमावेशक परिषदेत भारताने मसुदा दस्तावेज सादर केले होते. मात्र त्यांची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. कारण दहशतवादाची नेमकी व्याख्या काय, याबाबत सदस्य राष्ट्रांमध्ये एकमत नाही, असे सेठिया यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Un has no concrete policy against terrorism concern from india zws

ताज्या बातम्या