दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत भारतीय डॉक्टरांनी केलेल्या कामाची  संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली आहे. सरकारी व बंडखोर दलांच्या दरम्यान झालेल्या धुमश्चक्रीत जखमी झालेल्या हजारो लोकांवर भारतीय डॉक्टरांनी लष्कराच्या रुग्णालयात उपचार केले.
 संयुक्त राष्ट्रांच्या सुदानमधील दूतावासाने म्हटले आहे की, भारतीय लष्करी रुग्णालयाने मलाकल शहरात २३ डिसेंबपर्यंत ९७६ लोकांवर उपचार केले आहेत. या रुग्णालयाने १३४ शस्त्रक्रिया केल्या व २९ प्रसूती शस्त्रक्रियाही केल्या आहेत.
सुदान हा नव्याने जन्मलेला देश असून तेथे १५ डिसेंबरपासून अध्यक्ष साल्वा कीर यांची समर्थक सैन्य दले व बंडखोर यांची जोरदार धुमश्चक्री चालू असून बंडखोरांनी पदच्युत उपाध्यक्ष रीक माशर यांना पाठिंबा दिला आहे. मलाकल येथील संयुक्त राष्ट्रांच्या तळावर भारतीय शांतीसैनिकांनी यादवीग्रस्त भागात जखमी झालेल्या हजारो लोकांना वैद्यकीय उपचार दिले आहेत. संयुक्त राष्ट्रांचे मानवी कामकाज व आपत्कालीन मदत समन्वयक व्लॅलेरी अमॉस यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुदानमधील लष्करी मोहिमेस भेट दिली. ज्युबा व मलाकल येथील छावण्यांना त्यांनी गेल्या महिन्यात भेट दिली.  
त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाअंतर्गत असलेल्या अन्नधान्य साठवणगृहातून करण्यात आलेली लूट व आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या कार्यालयाची करण्यात आलेली नासधूस यांची पाहणी केली.  मानवतावादी कार्यात हस्तक्षेप हा बाधक ठरत असून आतापर्यंत ७,०२,००० लोकांना विस्थापित व्हावे लागले तर १,२३,००० लोक पळून गेले आहेत. भारतीय शांतीसैनिकांनी या संघर्षांत अनेकांचे प्राण वाचवले. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये संयुक्त राष्ट्र शांती मोहिमेतील भारतीय जवानांवर जोंगलेई राज्यात हल्ला झाला होता.