लिबियाचे माजी हुकूमशहा मोअम्मर गद्दाफी यांचे सरकार उलथून टाकणाऱ्या दहशतवाद्यांकडून लिबियातील कारागृहात कैद्यांवर मोठय़ा प्रमाणावर अत्याचार केले जात असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या  अहवालात म्हटले आहे.कारागृहात २७ कैद्यांचा अत्याचारामुळे मृत्यू झाल्याचे पुरावे हाती आले असल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला असून त्यापैकी ११ जण यावर्षी मृत्युमुखी पडले आहेत. दहशतवादी कारागृहांचा कारभार पाहत असून तेथील समस्यांनी उग्र स्वरूप धारण केल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या कार्यालयातून (मानव हक्क) जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.
लिबियाच्या पोलिसांमार्फत चालविल्या जाणाऱ्या कारागृहातील कैद्यांच्या स्थितीत सुधारणा होत असली तरी अनेक कारागृहांचा कारभार अद्यापही दहशतवाद्यांमार्फत चालविला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारची कारागृहे ताब्यात घेण्याची प्रक्रिया त्वरेने सुरू करावी, अशी विनंती तपास अधिकाऱ्यांनी लिबिया सरकारला केली आहे.