ॲप्पल कंपनीच्या iPhone ची क्रेझ जगभरात पाहायला मिळते. आयफोनसाठी किडनी विकू पण हाच फोन घेऊ, असे गमतीत देखील काही लोक म्हणत असतात. खासकरुन तरुणांमध्ये आयफोनची बरीच क्रेझ पाहायला मिळते. कर्नाटकात मात्र ही क्रेझ एका डिलिव्हरी बॉयच्या जीवाशी खेळ करणारी ठरली आहे. कर्नाटकमध्ये एका मुलाने नियोजन करुन एका डिलिव्हरी बॉयचा थंड डोक्याने खून केला. तसेच त्याचा मृतदेह रेल्वे स्थानकाजवळ नेऊन जाळून टाकत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून या धक्कादायक गुन्ह्याची कबुली मिळाली आहे.

कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे शहरात ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचे वय अवघे वीस वर्ष आहे, तर मृत्यूमुखी पडलेल्या डिलिव्हरी करणाऱ्या मुलाचे वय २३ वर्ष एवढे आहे. अर्सिकेरे शहराच्या अंककोप्पल रेल्वे स्थानकाजवळ ११ फेब्रुवारी रोजी कर्नाटक पोलिसांना एक जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासकार्यासाठी एका विशेष पथकाचे गठण केले यानंतर तपासात जी गोष्ट समोर आली ती हैराण करणारी होती.

हे वाचा >> जिवंत राहण्यासाठी ते स्वतःची लघुशंका प्यायले; दाम्पत्याला २९६ तासांनंतर ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं

अर्सिकेरे शहरातील लक्ष्मीपुरा भागात राहणाऱ्या हेमंत दत्ता (२०) या युवकाने ऑनलाईन सेकंडहँड आयफोन मागवला होता. ई-कार्ट कंपनीच्या हेमंत नाइक याला ही डिलिव्हरी करण्यासाठी पाठविण्यात आले. आयफोनची ऑर्डर घेऊन हेमंत नाइक लक्ष्मीपुरा भागातील दत्ताकडे पोहोचला. फोन डिलिव्हरी करताना हेमंतने कॅश ऑन डिलिव्हरीचे ४६ हजार रुपये आरोपी हेमंतकडे मागितले.

हेमंत नाइक पैसे मिळतील म्हणून आरोपी हेमंतच्या घराबाहेर उभा होता. मात्र आरोपीने त्याला बहाणा करुन घरात बोलावून घेतले. हेमंत नाईक घरात येताच आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला. हेमंतच्या शरीरावर लागोपाठ वार करत डिलिव्हरी बॉय हेमंतची हत्या करण्यात आली. खून केल्यानंतर मात्र आरोपी हेमंतला मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, हे सुचेना. त्यासाठी त्याने तीन दिवस मृतदेह घरातच ठेवला.

तीन दिवसांनंतर हेमंतचा मृतदेह स्कुटीवर टाकून पहाटे ४.५० वाजता हेमंत रेल्वे स्थानकाजवळ पोहोचला. अंककोप्पल रेल्वे स्थानकाजवळील निर्मनुष्य असलेल्या जागेवर स्कुटीवरुन मृतदेह खाली उतरवला आणि मोकळ्या जागेत जाळून टाकला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी हेमंतन सांगितले की, त्याच्याकडे डिलिव्हरी बॉयला द्यायला ४६ हजार रुपये नव्हते आणि त्याला आयफोन हवाच होता. त्यासाठी त्याने हेमंचा खून करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांना रेल्वे स्थानकाजवळ मृतदेह मिळाल्यानंतर त्यांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. ज्यामध्ये आरोपी स्कुटीवर मृतदेह घेऊन जाताना दिसत होता. त्यावरुन पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली होती.