नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने ओडिशामध्ये ‘हायब्रिड ॲन्युइटी मार्ग’अंतर्गत (एचएएम) सहा पदरी ‘रिंग रोड’ (भुवनेश्वर बायपास) उभारण्यास मंजुरी दिली आहे. या मार्गाचा एकूण खर्च ८, ३०७.७४ कोटी रुपये असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी दिली. या प्रकल्पामुळे अंदाजे ७४.४३ लाख प्रत्यक्ष तर ९३.०४ लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

‘महामार्गामुळे ओडिशा आणि पूर्वेकडील इतर राज्यांना कटक, भुवनेश्वर आणि खोर्दा शहरांतून होणारी जड व्यावसायिक वाहतूक वळवून मोठा फायदा होईल. यामुळे मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढेल, ‘लॉजिस्टिक्स’चा खर्च कमी होईल. तसेच या भागांतील सामाजिक-आर्थिक विकास होईल,’ असे सांगण्यात आले.

कोटा-बुंदी येथे नवीन विमानतळ

केंद्रीय मंत्रिमंडळाने राजस्थानमधील कोटा-बुंदी येथे १ हजार ५०७ कोटी रुपये खर्चाचा प्रस्तावित विमानतळाला मंजुरी दिली आहे. राजस्थान सरकारकडून या विमानतळासाठी १ हजार ८९ एकर (जवळपास ४४०.०६ हेक्टर) जमीन मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विमानतळाची वार्षिक २० लाख प्रवाशांची हाताळणी क्षमता असेल. त्याची उभारणी पुढील दोन वर्षात करण्याचे उद्दिष्ट आहे.

‘ऑनलाइन गेमिंग’ नियमन विधेयकाला मान्यता?

केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑनलाइन ‘रिअल मनी गेमिंग प्लॅटफॉर्म’चे नियमन करण्यासाठीच्या विधेयकाला मंजुरी दिल्याचे सूत्रांनी मंगळवारी सांगितले. हे विधेयक बुधवारी संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे.