देशात भाजपाशासित सरकार आल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर केला जात असल्याची टीका विरोधकांकडून वारंवार होत आहे. सीबीआय, ईडी, प्राप्तिकर विभाग यांच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याची टीका विरोधक करत आहेत. यादरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सक्तवसुली संचालनालय (ईडी) एक स्वायत्त संस्था असून तिचं काम करत आहे असं म्हटलं आहे. निर्मला सीतारामन अमेरिका दौऱ्यावर असून शनिवारी वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ईडीसंबंधी प्रश्न विचारण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईडीचा गैरवापर केला जात आहे का? असं विचारण्यात आलं असता त्या म्हणाल्या की “ईडी एक स्वायत्त संस्था असून, ते स्वतंत्रपणे आपलं काम करतात. गंभीर गुन्ह्यांची दखल घेत ते कारवाई करत असतात. अशा अनेक कारवाया आहेत ज्यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. हातामध्ये काही प्रथमदर्शनी पुरावे असल्यानेच ईडी तिथे जाऊन कारवाई करतं”.

विश्लेषण : ईडी खरंच विरोधकांना लक्ष्य करते? आकडेवारी काय सांगते? वाचा सविस्तर

निर्मला सीतारामन यांनी यावेळी जी २० आणि त्यांच्या प्राथमिकतेवरही भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की “आम्ही अनेक जी २० सदस्यांशी द्विपक्षीय चर्चा केली आहे. अनेक आव्हानं असतानाही आम्ही अध्यक्षपद स्वीकारत आहोत. आम्हाला सर्वांसह एकत्र काम करावं लागेल”.

“पाश्चिमात्य देश पुन्हा एकदा कोळसा वापराकडे वळत आहेत. ऑस्ट्रियानेही हीच गोष्ट सांगितलं आहे. युकेमध्ये पुन्हा एकदा थर्मल युनिट्स परतले आहेत. गॅस परवडत नसल्याने किंवा उपलब्ध नसल्याने फक्त भारतच नाही, तर अनेक देशांना वीजेच्या निर्मितीसाठी पुन्हा कोळसा वापरावर अवलंबून राहावं लागत आहे,” असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

रुपयाची घसरण आणि त्यावरील उपायांसंबंधी विचारण्यात आलं असता निर्मला सीतारामन यांनी भौगोलिक आणि राजकीय तणाव यासाठी जबाबदार असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या की “यावर उपाययोजना केल्या जात आहे. पण त्याचबरोबर व्यापार तूट सर्वत्र वाढत आहे. आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union finance minister nirmala sitharaman on ed being used as political toll us washington dc sgy
First published on: 16-10-2022 at 10:07 IST