पीटीआय, नवी दिल्ली : ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील निवडणूक प्रचारसभेत २००२ मध्ये हिंसाचार करणाऱ्यांना ‘धडा शिकवला’ असे केलेले वक्तव्य आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करणारे नव्हते,’ असे मत निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी शनिवारी व्यक्त केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल अभ्यासल्यानंतर आणि कायदेशीर मत जाणून घेतल्यावर, निवडणूक आयोगाच्या समितीने असा निष्कर्ष काढला आहे, की समाजकंटक किंवा समाजविरोधी घटकांवर कारवाई केल्याचा संदर्भ देणे हे आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन करणारे ठरत नाही. शहा यांनी गेल्या महिन्यात गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यातील महुधा शहरात एका निवडणूक प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावर एका माजी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती.
या प्रचारसभेत शहा म्हणाले होते, की गुजरातमध्ये काँग्रेसच्या राजवटीत (१९९५ पूर्वी) जातीय दंगली उसळल्या होत्या. काँग्रेस विविध समुदाय आणि जातीच्या लोकांना एकमेकांविरुद्ध लढण्यासाठी भडकवत असे. अशा दंगलींद्वारे काँग्रेसने आपल्या एकगठ्ठा मतांची बेगमी करून, समाजातील एका मोठय़ा वर्गावर अन्याय केला. गुजरातमध्ये २००२ मध्ये दंगली घडल्या. कारण गुन्हेगारांना काँग्रेसकडून मिळालेल्या प्रदीर्घ समर्थनामुळे हिंसाचाराची सवय झाली होती. परंतु २००२ मध्ये त्यांना धडा शिकवल्यानंतर या घटकांनी हिंसाचाराचा मार्ग सोडला. तेव्हापासून २०२२ पर्यंत हिंसाचार झाला नाही. जातीय हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून, भाजपने गुजरातमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित केली आहे.