टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, एलॉन मस्क यांना भारतात टेस्लासाठी मोठी गुंतवणूक करायची आहे. केंद्र सरकारच्या अटी आणि शर्तीमुळे टेस्लाची इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारात आतापर्यंत उतरु शकली नाहीत. आता टेस्लाची इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारात आणण्यासाठी टेस्लाचे प्रयत्न सुरु आहेत.

एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत भारत दौऱ्याबाबत संकेत दिले होते. एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत टेस्लाच्या भारतातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. एलॉन मस्क यांच्या टेस्लाला भारतात गुंतवणूक करण्यासाठी काही सवलती हव्या आहेत. टेस्लाचा प्रकल्प जर भारतात आला तर महाराष्ट्रात येणार की गुजरातमध्ये? हे लवकरच कळेल. मात्र, यावर आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सूचक विधान केले आहे. “टेस्ला सारख्या कंपन्या भारतात स्वारस्य दाखवत आहेत. कारण त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येण्याबद्दल विश्वास आहे”, असे पियुष गोयल म्हणाले.

हेही वाचा : विश्लेषण: ट्रम्प यांच्याविरोधातील ‘हश मनी’ खटला काय आहे? ट्रम्प यामुळे अडचणीत येतील का?

पियुष गोयल काय म्हणाले?

“इलेक्ट्रिक वाहनांसाठी जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारतात प्रचंड क्षमता आहे. इलॉन मस्क भारताकडे एक जागतिक बाजारपेठ म्हणून पाहत आहेत. टेस्ला सारख्या कंपन्या भारतात जास्त स्वारस्य दाखवत आहेत. कारण त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येण्याबाबत विश्वास आहे. इलेक्ट्रिकच्या मोबिलिटीमध्येही भारत आघाडीवर असून संपूर्ण जग याची दखल घेत आहे”, असे पियुष गोयल म्हणाले.

टेस्लाचा प्रकल्प कुठे सुरु होईल?

टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये उभारणार, याबाबत विचारले असता पियुष गोयल म्हणाले, “हम भारत के रहने वाले है भारत की बात करते है”, (आम्ही भारतात राहतो आणि आम्ही भारताबद्दल बोलतो), असे उत्तर पियुष गोयल यांनी दिले.