राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निर्देश सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. तसेच मुख्य सचिवांनी सेवाज्येष्ठता व योग्यतेनुसार तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी नावे मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडे पाठवावीत, यापैकी एका अधिकाऱ्याची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली जाईल, असेही निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार आज निवडणूक आयोगाने संजय वर्मांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. रश्मी शुक्ला यांच्यानंतर आता राज्याच्या पोलीसदलाची सुत्रे संजय वर्मा यांच्याकडे असणार आहे.

हेही वाचा – निवडणुकीपूर्वी बदली झालेल्या रश्मी शुक्ला कोण आहेत? विरोधकांनी त्यांच्या बदलीची मागणी का केली होती?

कोण आहेत संजय वर्मा?

संजय वर्मा हे मुळचे उत्तर प्रदेशचे असून ते १९९० च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे त्यांच्याकडे तीन दशकाहून अधिक काळ पोलीस सेवेत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते कायदा व तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

संजय वर्मा हे न्यायवैद्यक विज्ञानातील त्यांच्या कौशल्यांसाठी ओळखले जातात. कायदा व तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी न्यायवैद्यक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. गुन्हा घडल्याच्या ठिकाणाचा तपास आणि तेथून पुरावे गोळा करण्यासाठी त्यांनी राज्यात जवळपास दोन हजारांहून अधिक तज्ञांची चमू तयार केली. त्यांच्या कार्याबद्दल अनेकदा त्यांचे कौतुकही करण्यात आले.

हेही वाचा – विश्लेषण : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर निवडणूक आयोगाने का हटविले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातील २५ हून अधिक पोलीस अधिकारी, तर ३०० हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली नव्हती. रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. त्यामुळे निवडणुकीच्या काळात अशा व्यक्तीने राज्याच्या पोलीस महासंचालकपदी राहू नये अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयुक्तांची भेटही घेतली होती. त्यानंतर काल निवडणूक आयोगाकडून रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे निर्देश देण्यात आले.