काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी गुजरातबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना भाजपने प्रत्युत्तर देत विकासकामांची जंत्रीच पत्रकार परिषदेत वाचून दाखवली. संपूर्ण प्रचार मोहिमेत राहुल गांधी खोटे बोलले असून ते सातत्याने चुकीचे वक्तव्यं करत असल्याची टीका केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केली. आता तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष झाला आहात. तुमची जबाबदारी वाढली असून आता तर खोटे बोलणे सोडा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. एकीकडे आम्ही सी-प्लेन बाबत बोलत आहोत तर दुसरीकडे काँग्रेस सी प्लॅन (करप्शन प्लॅन) बनवत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

रवीशंकर प्रसाद म्हणाले, भाजप सहा कोटी गुजरातींच्या विकासाबाबत बोलत आहे. तर काँग्रेसकडून राहुल गांधी खोटी वक्तव्ये करत जनतेची दिशाभूल करताना दिसत आहेत. मला माहीत नाही की, राहुल यांच्या भाषणाची तयारी कोण करून घेतात ? त्यांना आकडेवारी कोण पुरवतात? याची मला काहीच माहिती नाही. त्यांच्याकडे असलेली सर्व आकडेवारी खोटी आहे. राहुल गुजरातच्या जनतेबरोबर खोटं बोलत आहेत. काँग्रेसकडे विकासाचा कोणता रोडमॅपच नसल्याचे त्यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी गुजरातमधील कापूस, भूईमूग आणि विजेच्या उत्पादनाशिवाय रोजगारशी संबंधित आकडेवारी सांगितली. राहुल गुजरातमधील रोजगारासंबंधी प्रश्न उपस्थित करतात, कारण त्यांच्याकडे याबाबतचे आकडे नाहीत. काँग्रेसच्या काळात लघु आणि मध्यम स्वरूपाचे १,७८,००० उद्योग होते. त्यांची संख्या आता ३,७६,०५७ इतकी झाली आहे. राहुल गांधी यांना सल्ला देताना रवीशंकर प्रसाद म्हणाले, आता तुम्ही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाला असून तुमची जबाबदारी वाढली आहे. आता खोटं बोलणं बंद करा.