नवी दिल्ली : केंद्राच्या तीन शेती कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्ली- हरियाणा सीमेवरील सिंघू येथे तळ ठोकून असलेले निहंग शीख हे ठिकाण सोडून जाण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

निहंग पथांची महापंचायत बुधवारी सिंघू येथे पार पडली असून, तिच्यातील निर्णय नंतर जाहीर केले जाणार आहेत. मात्र, ‘आम्ही सिंघू सीमेवरून निघून जाण्याची शक्यता नाही. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही येथे आहोत’, असे या बैठकीत सहभागी झालेल्या एका सूत्राने सांगितले.

शिखांच्या पवित्र ग्रंथाची कथित विटंबना केल्याबद्दल एका दलित मजुराची आंदोलनस्थळी हत्या करण्यात आली होती. यानंतर, शेती कायदेविरोधी आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांची शीर्षस्थ संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने निहंगांना आंदोलन स्थळ सोडून जाण्यास सांगितले होते. त्यानंतर ही घडामोड झाली आहे.पंजाबच्या तरण तारण येथील लखबीर सिंग नावाच्या तरुणाचा हात कापलेल्या अवस्थेतील मृतदेह १५ ऑक्टोबरला सिंघू सीमेवरील शेतकरी आंदोलनस्थळी एका पोलीस बॅरिकेडला बांधलेला आढळला होता. या संबंधात दोन निहंगांना अटक करण्यात आली होती, तर आणखी दोघांनी सोनिपत पोलिसांपुढे शरणागती पत्करली होती.