UNSC meet : कलम ३७० हा आमचा अंतर्गत विषय ; भारताची स्पष्ट भूमिका

अपेक्षेप्रमाणे चीनने घेतली पाकिस्तानचीच बाजू

संग्रहीत छायाचित्र

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत(यूएनएससी) चीनच्या मागणीवरून जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये रशियाने भारताला पाठिंबा दिल्याचे दिसले , दुसरीकडे अपेक्षेप्रमाणे चीनने पाकिस्तानची बाजू लावून धरली होती. रशियाने काश्मीरप्रश्नी केवळ द्विपक्षीय चर्चेचे समर्थन केले आहे. तर कलम ३७० हा आमचा अंतर्गत विषय असल्याचे भारताने यावेळी स्पष्ट केले .

बैठक संपल्यानंतर चीनच्या राजदूतांनी म्हटले की, भारताने जो काही निर्णय घेतला आहे त्यामुळे येथील परिस्थिती बदलली आहे. काश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक आहे. चीनने हे देखील म्हटले की, कोणीही एकतर्फी निर्णय घेऊ नये, अशी एकतर्फी कारवाई योग्य नाही. जम्मू-काश्मीरचे कलम ३७० भारत सरकारने रद्द केल्यामुळे पाकिस्तान चवताळलेला आहे. त्यामुळेच पाकिस्तानकडून सातत्याने संयुक्त राष्ट्रांकडे जम्मू-काश्मीरच्या  मुद्दावर हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.

तर संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले की, कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. यामध्ये बाहेरच्या लोकांची आवश्यकता नाही. जम्मू-काश्मीरच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी भारताने हा निर्णय घेतला आहे. सरकार हळूहळू येथील निर्बंध हटवत असल्याचेही त्यांनी सांगितले. तर, पाकिस्तानचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, एक देश जिहाद आणि हिंसेची गोष्ट करत आहे. मात्र आम्ही आमच्या धोरणावर नेहमीप्रमाणे कायम आहोत. हिंसा कोणत्याच समस्येचे मुळ नाही.


चीनच्या आग्रहाखातर बंद खोलीत ही बैठक घेण्यात आली, असे पहिल्यादांच झाले आहे. या अगोदरची बैठक १९७१ च्या मुद्यावर झाली होती. यूएनएससीमध्ये सदस्य संख्या १५ आहे. ज्यामध्ये ५ स्थायी व १० अस्थायी सदस्य आहेत. अस्थायी सदस्यांचा कार्यकाळ काही वर्षांचाच असतो, तर स्थायी सदस्य हे कायम असतात. स्थायी सदस्यांमध्ये अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स यांचा समावेश आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Unsc meeting russia supports india on kashmir issue msr

ताज्या बातम्या