वृत्तसंस्था, नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ५८ मिनिटांची एक चित्रफीत जारी केली आहे. तिला ‘द अनटोल्ड काश्मीर फाइल’ असे नाव देण्यात आले आहे. यात दहशतवादाच्या झळा सर्वधर्मीय काश्मिरी रहिवाशांना कशा पोहोचल्या, याचे चित्रीकरण आहे. ४ एप्रिल रोजी काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडित आणि स्थलांतरितांवर हल्ल्यांच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ही चित्रफीत जारी केली.
सध्या चर्चेत असलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर ‘द अनटोल्ड काश्मीर फाइल’ चित्रफीत तयार करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांतर्फे सांगण्यात आले, की काश्मीरच्या रहिवाशांच्या भोगाव्या लागलेल्या दु:ख-वेदनेची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. दहशतवादाशी संघर्षांत आपण सर्व एक आहोत, असा संदेश या चित्रफितीद्वारे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही चित्रफीत जम्मू-काश्मीर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ३१ मार्चला जारी करण्यात आली. त्यानंतरही ४ एप्रिलला काश्मीर खोऱ्यातील स्थलांतरित व काश्मिरी पंडितांवर हल्ले झाले. दिल्लीतील संरक्षण विभागात याविषयी चिंता निर्माण झाली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात केवळ काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि त्यांच्या दुर्दशेचे चित्रण केले आहे. मात्र, काश्मीरच्या मुस्लीम नागरिकांचीही दहशतवादामुळे दुर्दशा झाली आहे. त्याकडे या चित्रपटात दुर्लक्ष करण्यात आले आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या या चित्रफितीच्या प्रारंभी एक विलाप करणारी महिला दिसते. त्याखाली माहिती दिलेली आहे, की २७ मार्च रोजी संशयित दहशतवाद्यांनी विशेष पोलीस अधिकारी इश्फाक अहमद आणि त्यांचे बंधू उमर जान यांची घरात घुसून हत्या केली. या माहितीसह या दोघा मृतांची छायाचित्रे चित्रफितीत दिसतात. शोकसंतप्त काश्मिरी नागरिकांचे छायाचित्र दाखवून या चित्रफितीत माहिती दिलेली आहे, की काश्मीरने आतापर्यंत २० हजार नागरिकांना दहशतवादी हल्ल्यांत गमावले आहे. आता याविरुद्ध आपण एकत्र येऊन व्यक्त होण्याची वेळ आली आहे. पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज यांची गाजलेली ‘हम देखेंगे’ ही कविता ऐकायला मिळते. ही कविता ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातही वापरलेली आहे.
‘काश्मीरवासीयांत विश्वासनिर्मितीचा प्रयत्न’
भाजपशासित राज्यांत ‘द काश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्यात आला असून, पंतप्रधान मोदींसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी या चित्रपटाला जोरदार पाठिंबा दिला आहे. मात्र, जम्मू-काश्मीरच्या अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले, की या चित्रपटात ठरावीक अंगाचेच कथानक दाखवले आहे. पण काश्मीर खोऱ्यात त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. येथील सर्व जण राष्ट्रीय वाहिन्या पाहतात. त्यामुळे या चित्रपटावरून येथे वाढती अस्वस्थता आहे. खरे तर सध्या आंतरराष्ट्रीय आर्थिक कृती दलाने (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) दहशतवादाला आर्थिक रसद पुरवल्याच्या संशयावरून पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकून त्याला खुलासा मागितला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा काश्मीरमधील हस्तक्षेप सध्या तुलनेने थंडावला आहे. या पार्श्वभूमीवर काश्मिरी जनतेच्या जखमांवर मलम लावण्याची ही योग्य वेळ असताना, ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट आला. त्यामुळे ‘द अनटोल्ड काश्मीर फाइल’ चित्रफितीद्वारे काश्मिरी जनतेत विश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.