उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात लोकप्रिय घोषणा आणि आमिषांच्या राजकारणाला सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी समाजवादी स्मार्टफोन योजनेची घोषणा केली. या योजनेतंर्गत उत्तर प्रदेशातील ६ लाखांपेक्षा कमी उत्त्पन्न असणाऱ्या आणि वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीला मोबाईल फोन मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार असून ही नोंदणीप्रक्रिया एका महिन्यासाठी सुरू असेल. दरम्यान, या योजनेच्या घोषणनेनंतर विरोधकांकडून समाजवादी पक्षावर मतदारांना आमिष दाखवल्याचा आरोप होत आहे. मात्र, ही योजना केवळ आमिष दाखविण्यापोटी सुरू केली नसल्याचा दावा अखिलेश यांच्याकडून करण्यात आला आहे. सरकारच्या सर्व योजनांचा लाभ लोकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहचत आहेत किंवा नाही, याचा आढावा घेण्यासाठी समाजवादी स्मार्टफोन योजना सुरू करण्यात आल्याचे अखिलेश यांनी सांगितले. समाजवादी पक्षाकडून सुरू करण्यात आलेली पेन्शन योजनाही अशाचप्रकारे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या योजनेची ब्रँड अॅम्बेसिडर अभिनेत्री विद्या बालन हिच्या साडीवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता. विद्या बालनने सरकारी जाहिरातींमध्ये समाजवादी पक्षाच्या झेंड्याच्या रंगाची साडी परिधान केली आहे आणि समाजवादी पक्ष सरकारी पैशांनी पक्षाचा प्रचार करत आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता.
यापूर्वी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी जयललिता यांनी मतदारांवर अशाचप्रकारच्या घोषणांचा पाऊस पाडला होता. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आणि घरगुती ग्राहकांना १०० युनिटपर्यंत मोफत वीज देणे, मंगळसूत्रासाठी महिला लाभार्थ्यांना सोन्याचे जादा वाटप , दारूच्या दुकानांचे कामाचे तास कमी करणे अशा घोषणांचा जयललिता यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up cm akhilesh yadav launches free samajwadi smartphone scheme
First published on: 10-10-2016 at 13:28 IST