उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तारखा जवळ आल्या आहेत. राजकीय पक्षांनी देखील निवडणुकांसाठी पूर्ण तयारी केली आहे. अशात अनेक नेत्यांचे पक्षांतर सुरू आहेत. उत्तर प्रदेशमध्ये अनेक मोठ्या चेहऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपले पक्ष बदलले आहे. बुधवारी समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि मुलायम सिंग यादव यांच्या सून अपर्णा यादव यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसच्या ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या मोहिमेचा चेहरा असलेल्या प्रियांका मौर्या भाजपाच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जातंय.

उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या ‘लडकी हूं, लड सकती हूं (मी मुलगी आहे, मी लढू शकते)’ या मोहिमेचा चेहरा असलेल्या प्रियंका मौर्या भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील होण्याची शक्यता आहे, असे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यात आल्याच्या काही दिवसांनंतर ही बातमी समोर आली आहे. त्यानंतर तिकीट वाटप प्रक्रियेत अनियमितता केल्याचा आरोप प्रियांका मौर्या यांनी केला होता.

मौर्या बुधवारी लखनौ येथील भाजपा कार्यालयात उपस्थित होत्या. यावेळी “तुम्ही भाजपात सामील होणार आहात का, असं विचारलं असता त्यावर त्यांनी उत्तर दिले, की कदाचित, होय. मी काँग्रेससाठी खूप काम केले आहे, परंतु तिकीट वाटप पूर्वनियोजित होते. मी एक पात्र उमेदवार होते, परंतु मला तिकीट दिले गेले नाही,” असं त्यांनी म्हटलंय. 

‘लडकी हूं, लड सकती हू’ ही काँग्रेसची घोषणा आहे, पण काँग्रेसने मला निवडणूक लढवण्याची संधी दिली नाही,” असे त्या पुढे म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१५ जानेवारी रोजी काँग्रेसने १५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. ज्यात ५० महिलांचा समावेश होता, मौर्या यांनी पक्षाच्या एका कार्यकर्त्यावर तिकिटासाठी पैसे देण्यास सांगितल्याचा आरोप केला. त्यानंतर काँग्रेस पक्ष महिलाविरोधी आणि ओबीसीविरोधी असल्याचं म्हटलं होतं.