उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्र्यांनी गत चार वर्षांत चहा आणि समोस्यांवर तब्बल नऊ कोटी रूपयांचा चुराडा केला आहे. १५ मार्च २०१२ ते १५ मार्च २०१६ या कालावधीत यूपी सरकारने यावर सुमारे ८,७८,१२,४७४ रूपये खर्च केले आहेत. विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीच ही आकडेवारी विधानसभेत जाहीर केली आहे. यूपी सरकारच्या या खर्चाची सध्या सर्वत्र चवीने चर्चा केली जात आहे.
चहा, नाश्त्यावर खर्च करण्यामध्ये यूपी मंत्रिमंडळातील सामाजिक कल्याण मंत्री अरूणकुमार कोरी हे आघाडीवर आहेत. त्यांनी या चार वर्षांत २२,९३,८०० रूपये खर्च केले आहेत. यात दुसऱ्या क्रमांकावर नगर विकासमंत्री मोहम्मद आझम खान असून त्यांनी २२,८६,६२० तर महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री कैलास चौरासिया यांनी २२,८५,९०० रूपये खर्च केले आहेत. उल्लेखनीय म्हणजे लोकनिर्माण मंत्री शिवपाल यादव यांनी मात्र चहा, नाश्त्यावर एक रूपयाही खर्च केलेले नाही. इतर ज्येष्ठ मंत्री रामकरण आर्य आणि जगदीश सोनकर यांनीही सुमारे २१ लाख रूपयांपेक्षा अधिक खर्च केले आहेत.
नियमानुसार राज्यात प्रति दिन २५०० तर राज्याबाहेर असाल तर ३ हजार रूपये प्रति दिन चहा नाश्त्यावर खर्च करण्याची मंत्र्यांना मुभा असल्याचे अखिलेश यादव यांनी सांगितले. ऑक्टोबर २०१५ मध्ये पदावरून हटवण्यात आलेले माजी मंत्री शिवकुमार बेरिया यांनी आपल्या कार्यकाळात २१,९३,९०० रूपये खर्च केले होते. महिला कल्याण मंत्री सदब फातिमा यांनीही ७२,५०० रूपये खर्च केले आहेत.
यूपी सरकारच्या उधळपट्टीवर भाजपने टीका केली असून पक्षाचे प्रवक्ता हरिश्चंद्र श्रीवास्तव यांनी जनतेच्या पैशांची ही लूट असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकार आरोग्य, शिक्षण सुविधा देण्यास अपयशी ठरत आहे, अशी टीका त्यांनी केली. तर समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी मंत्रिमंडळाचा बचाव केला आहे. हा सर्व पैसा अधिकृत बैठकांवर खर्च केला आहे. मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघातून अनेक लोक भेटायला येतात. त्यांच्यासाठीच हा खर्च केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2016 रोजी प्रकाशित
यूपी सरकारच्या मंत्र्यांनी नाश्त्यावर खर्च केले ९ कोटी रूपये
मंत्री शिवपाल यादव यांनी मात्र चहा, नाश्त्यावर एक रूपयाही खर्च केलेले नाही.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 01-09-2016 at 09:59 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up ministers spent 9 crores on snacks