पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे जाणाऱ्या वाहन मार्चला पोलिसांनी रोखलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी हरियाणा उत्तर प्रदेश सीमेवर हा मार्च रोखला. तसेच शाहजहापूरमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. लखीमपूरला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यानंतर आता नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावरही पोलीस कारवाई झाल्यानं काँग्रेस आक्रमक झालीय. पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झालेली पाहायला मिळाली. गाडी मार्चमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस कारवाईनंतर रस्त्यावरच धरणं आंदोलन सुरू केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाडी मार्च रोखल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना चांगलंच फैलावर घेतलं. ते म्हणाले, “केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय शर्मा आणि त्यांचा मुलगा कायद्यापेक्षा मोठा आहे का? त्यांना अटक का केली नाही? त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीवर गाडी घालून चिरडलंय. तुम्ही त्यांना काही म्हणणार नाही आणि आम्हाला कायदा शिकवणार. तुम्ही निवडक लोकांना पुढे जाऊ द्या, नाहीतर तुम्हाला आम्हाला मारायचं असेल तर मारा, आम्ही जाणारच.”

यावेळी पोलिसांनी त्यांना बसण्यास सांगितलं, चहा घ्यायला विचारलं मात्र सिद्धू यांनी कशालाही जुमानलं नाही. ज्यांनी आरोपी मिश्राला मोकळं सोडलंय त्यांचा चहाही नको, असं मत सिद्धू यांनी व्यक्त केलं. “आमच्याकडे पाठीवर वार करत नाही. आमच्याकडे छातीवर वार करतात. त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठिवर गाड्या चढवल्या. तुम्हाला मारायचं तर मारा. आम्ही राहुल गांधींचे सैनिक आहोत,” असं मत सिद्धूंनी व्यक्त केलं.

लखीमपूर खेरीकडे गाडी मार्चला सुरुवात करण्याआधी नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले, “उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही, तर मी जेथे असेल तेथे उपोषणाला सुरुवात करेल.”

काँग्रसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत या गाडी मार्चची माहिती दिलीय. या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “लखीमपूर खेरी हिंसाचाराविरोधात आणि शहीद शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नेतृत्वात आमदार, नेते आणि कार्यकर्ते लखीमपूरकडे रवाना झाले आहेत. काँग्रेस न्यायाच्या लढाईत शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत आहे.” विशेष म्हणजे या ट्विटमध्ये काँग्रेसने #SackAjayMishra असा हॅशटॅगही वापरलाय.

काँग्रेस नेते हरिश रावत यांनी देखील लखीमपूर घटनेवर प्रतिक्रिया दिलीय. “देशातील लोकशाही धोक्यात आहे. सहिष्णु भारत असहिष्णु होत आहे. लखीमपूर खेरीची घटना याचंच उदाहरण आहे. उत्तराखंड काँग्रेसने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लखीमपूर चलोचं आवाहन केलंय.”

राजस्थान काँग्रेसच्या शेकडो गाड्या लखीमपूरकडे रवाना

एकूणच काँग्रेसने विविध राज्यातील नेते आणि कार्यकर्ते लखीमपूर खेरीकडे रवाना होत आहेत. काँग्रेसने राजस्थानमधील मार्चची माहिती देताना सांगितलं, “लखीमपूर खेरी हिंसाचाराविरोधात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह गोतसरा यांच्या नेतृत्वात शेकडो गाड्यांचा ताफा उत्तर प्रदेश सीमेकडे रवाना झालाय. काँग्रेस शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या लढाईत त्यांच्या नातेवाईकांसोबत असेल.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up police detained navjyot singh sidhu in shahjahanpur while leading vehicle march to lakhimpur pbs
First published on: 07-10-2021 at 17:00 IST