केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विद्यार्थी जर अंध, लोकोमोटर अक्षमता किंवा सेरेब्रल पाल्सी या विकारांनी ग्रस्त असेल तर त्याला प्राथमिक व मुख्य परीक्षेत लेखनिकाची मदत घेता येईल असे आयोगाने म्हटले आहे. असे विकार असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक तासामागे २० मिनिटे अधिक वेळ देण्याचेही मान्य करण्यात आले आहेत.
असे विकार झालेल्या विद्यार्थ्यांना ४० टक्के शारीरिक अडचणी असतील म्हणजे लिहिताच येत नसेल तर लेखनिक वापरता येईल अन्यथा त्यांना स्वत:च्या हाताने उत्तरपत्रिका लिहावी लागेल.
सेरेब्रल पाल्सी हा मेंदूविकार असून त्यामुळे शरीराच्या हालचालींवर परिणाम होतो. लोकोमोटिव्ह विकारात सांधे व स्नायू काम करीत नाहीत. जी मुले या विकारांनी ग्रस्त असतील व भारतीय वनसेवेची परीक्षा देत असतील त्यांना प्रत्येक पेपरला ६० मिनिटे वाढीव वेळ दिला जाईल. ज्यांची दृष्टी चाळशीस टक्के अधू असेल त्यांना लेखनिकाची मदत घेता येईल. त्यांनाही प्रत्येक पेपरसाठी साठ मिनिटे जादा वेळ दिला जाईल, प्रत्येक पेपरला तीन तास वेळ असेल असे भारतीय वनसेवेच्या परीक्षा परिपत्रकात म्हटले आहे. बदलत्या स्वरूपामुळे वनसेवेची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलकी सेवा परीक्षेची सामायिक प्राथमिक परीक्षा द्यावी लागेल व  नंतर पात्र विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय सेवा (मुख्य) व वनसेवा (मुख्य) परीक्षेसाठी स्वतंत्र याद्या तयार करण्यात येतील. नागरी सेवा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेतल्या जातात. त्यात प्राथमिक, मुख्य व मुलाखत असे तीन टप्पे असतात. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा  व भारतीय वनसेवा या परीक्षांचे उमेदवार या चाळण्यांमधून निवडले जातात.