पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले नेते आहेत त्यामुळे तेथे घटनाबाह्य़ पद्धतीने लोकशाही हाणून पाडण्याचा प्रयत्न केल्यास तो आम्ही सहन करणार नाही असे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकेचा अजूनही शरीफ यांना पाठिंबा आहे काय व इमरान खान व इतर निदर्शकांना आपला संदेश काय असे विचारले असता परराष्ट्र विभागाच्या प्रवक्तया मारी हार्फ यांनी सांगितले की, आमचा शरीफ यांना पाठिंबा आहे. ते लोकशाही मार्गाने निवडून आलेले नेते आहेत.
आम्ही हे वारंवार स्पष्टही केले आहे. पाकिस्तानातील निदर्शनांवर आमचे बारकाईने लक्ष आहे. सर्व पक्षांनी एकत्र बसून मतभेद मिटवावेत असे आम्हाला वाटते. घटनाबाह्य़ पद्धतीने नेतृत्वात बदल करण्याचा प्रयत्न केल्यास ते सहन केले जाणार नाही. पाकिस्तानमधील स्थितीवर आमचे लक्ष आहे.
२०१३ च्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप पाकिस्तान तेहरिक ए इन्साफचे नेते इमरान खान यांनी केला आहे त्यावर हार्फ यांनी सांगितले की, नवाझ शरीफ हे पाकिस्तानातील निर्वाचित नेते आहेत. पाकिस्तानात १९९९ मध्ये लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी बंड करून शरीफ यांच्या हातातून सत्ता हिसकावली होती. आताच्या पेचप्रसंगात सरकार व निदर्शक यांच्यात लष्कराची भूमिका बरीचशी तटस्थ राहिली आहे. या वेळीही शरीफ विरोधकांनी त्यांना पायउतार होण्यासाठी मोठा दबाव आणला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us backs nawaz sharif
First published on: 06-09-2014 at 03:15 IST