अमेरिकन सरकारने आठ देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना लॅपटॉप, आयपॅड्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यावर बंदी घातली आहे. यामुळे आठ देशांमधून अमेरिकेत हवाईमार्गे येणाऱ्या प्रवाशांना मंगळवारपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वत:सोबत आणता येणार नाहीत. बंदीच्या या नव्या आदेशामागील कारण व्हाईट हाऊसकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. यावर अद्याप अमेरिकन सुरक्षा यंत्रणांकडूनही कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. रॉयल जॉर्डेनियन एअरलाईन्सच्या प्रसिद्धीपत्रकातून आणि सौदी अरेबियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेकडून या नव्या आदेशाची माहिती प्रसिद्ध झाली.
इजिप्त, जॉर्डन, कुवेत, मोरोक्को, कतार, सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमधील १० विमानतळांवरुन थेट अमेरिकेला जाणाऱ्या विमानांमधून प्रवाशांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेता येणार नाहीत, असे अमेरिकन सुरक्षा यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र या बंदीमागील नेमके कारण सांगणे, या अधिकाऱ्याने टाळले.
मोबाईल आणि आरोग्याशी संबंधित उपकरणे या बंदीमधून वगळण्यात आली असल्याचे रॉयल जॉर्डेनियन एअरलाईन्सने म्हटले आहे. इतर देशांमधून अमेरिकेला जाणाऱ्या विमानांमधील प्रवाशांना ही बंदी लागू करण्यात येणार का, यावरही अमेरिकन सरकारकडून अधिकृतपणे भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. होमलँड सुरक्षा विभागाचे प्रवक्ते डेविड लोपन यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. होमलँड सिक्युरिटीजचा भाग असलेल्या वाहतूक सुरक्षा प्राधिकरणानेदेखील यावर भाष्य करण्यास असमर्थता दर्शवली आहे.
अमेरिकन सरकारकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांचा फटका न्यूयॉर्क, शिकागो, डेट्रॉईट आणि माँट्रेलला जाणाऱ्या विमानांना बसेल, असे रॉयल जॉर्डेनियन एअरलाईन्सने म्हटले आहे. तर सौदी अरेबियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने अमेरिकेकडून लागू करण्यात आलेल्या बंदीमुळे रियाध आणि जेद्दाहवरुन अमेरिकेला जाणाऱ्या विमानांना फटका सहन करावा लागेल, असे म्हटले आहे.
‘हल्ले टाळण्याच्या हेतूने अमेरिकेने सुरक्षा योजना राबवल्या आहेत. आठ देशांमधील विमानतळांवरुन येणाऱ्या प्रवाशांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यावर घालण्यात आलेली बंदी, त्यामधील एक पाऊल आहे,’ असे रँड कोर्पचे सुरक्षातज्ज्ञ ब्रायन जेनकिन्स यांनी म्हटले आहे.