हिजबूलचा कमांडर बुरहान वानी याला कंठस्नान घालण्यात आल्याचा आणि काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित केल्याबद्दल भारताने पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांच्या वर्तनाची प्रशंसा करीत असून अन्य देशांच्या प्रांताची लालसा बाळगत असल्याचे भारताने म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोधी यांनी काश्मीर आणि वानीच्या हत्येबाबात प्रक्षोभक वक्तव्य केल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत अय्यद अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला.

काश्मीरचा प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच मलीहा लोधी यांनी वानी याची हत्या न्यायालयीन चौकटीच्या बाहेर जाऊन करण्यात आल्याचे नमूद केले. इतकेच नव्हे तर वानी याचा उल्लेख काश्मीरचा नेता असाही केला. लोधी या सातत्याने संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध व्यासपीठांवर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करतात, वानी याची हत्या म्हणजे भारतीय लष्कराकडून काश्मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली करण्यात येत असल्याचे धडधडीत उदाहरण आहे, असेही त्या म्हणाल्या.

काश्मीरच्या जनतेला स्वयंनिर्णयाचा अधिकार नाकारण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. वानीची हत्या करण्याबरोबरच भारतीय लष्कराने जवळपास १२ काश्मिरी निष्पाप नागरिकांची हत्या केली हेही धडधडीत उदाहरण आहे, असे त्या म्हणाल्या. लोधी यांच्या वक्तव्यावर हल्ला चढविताना अकबरुद्दीन म्हणाले की, दहशतवाद्यांच्या वर्तनाची पाकिस्तान प्रशंसा करीत आहे, पाकिस्तान अशा प्रकारचे वर्तन सातत्याने करीत असल्यानेच त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क परिषदेचे सदस्यत्व मिळालेले नाही. लोधी यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दलही अकबरुद्दीन यांनी जोरदार हल्ला चढविला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठाचा पाकिस्तान दुरुपयोग करीत आहे, असे ते म्हणाले.

जो देश दुसऱ्यांच्या प्रदेशाची लालसा बाळगत आहे, दहशतवाद्यांना आश्रय देत आहे आणि दहशतवाद्यांच्या वर्तनाची प्रशंसा करून संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठाचा दुरुपयोग करीत आहे, अशी खंतही अकबरुद्दीन यांनी व्यक्त केली.