Will Donald Trump Restrict H-1B Visa? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यवधी भारतीयांची नाराजी ओढवून घेतली आहे. अमेरिकेकडून भारतावर आधी २५ टक्के, त्यावर दंडात्मक टॅरिफ लागू करण्यात आलं. त्यानंतर सोमवारी आणखी टॅरिफ लागू करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली. आता त्यांच्याच सरकारमधील एका महिला खासदाराने भारतीय विद्यार्थी वा नोकरीसाठी इच्छुक तरुणांना दिला जाणारा H-1b व्हिसा रद्द करण्याबाबत भाष्य केलं असून त्यामुळे अमेरिकेतील वा तिथे जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांच्या चिंता वाढल्या आहेत.

अमेरिकन खासदार मारजोरिया टेलर ग्रीन यांनी सोमवारी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे भारतीयांना दिल्या जाणाऱ्या व्हिसाचा मुद्दा चर्चेत आला आहे. अमेरिकेत शिकण्यासाठी वा नोकरी करण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना H-1b व्हिसा दिला जातो. मात्र हा व्हिसा देणं बंद केलं जावं, अशी मागणी या महिला खासदाराने केली आहे. त्यामुळे टॅरिफ अस्रानंतर आता डोनाल्ड ट्रम्प भारताविरोधात व्हिसाचं शस्त्र वापरणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हटलंय मारजोरिया टेलर ग्रीन यांनी सोशल पोस्टमध्ये?

ग्रीन यांनी ४ ऑगस्ट अर्थात सोमवारी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ वाढवण्यासंदर्भात केलेली पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी स्वत:चा एक मेसेज लिहिला आहे. “टॅरिफऐवजी अमेरिकन नोकऱ्या करण्यासाठी भारतीयांना दिले जाणारे H-1b व्हिसा रद्द करा”, अशी पोस्ट ग्रीन यांनी केली आहे. त्यासोबतच युक्रेन-रशिया युद्धासाठी अर्थसहाय्य व शस्त्रास्रांची मदत बंद करण्याचंही आवाहन ग्रीन यांनी केलं आहे.

व्हिसाबाबतच्या चर्चेला सुरुवात

दरम्यान, ग्रीन यांनी केलेल्या या विधानाचा संबंध थेट अमेरिकेच्या संसदेतील कोणत्याही विधेयकाशी नसला, तरी त्यामुळे भारतीयांना दिल्या जाणाऱ्या व्हिसाबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेतील बेकायदा स्थलांतरितांचा मुद्दा व कुशल मनुष्यबळाचा मुद्दा त्यांनी सातत्याने प्रचारसभांमधून मांडला होता. सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांना परत पाठवण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यातून अनेक विदेशी नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आले. त्यात टॅरिफवरून भारत व अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध ताणले गेले असतानाच ग्रीन यांच्या या विधानामुळे अमेरिकेतील भारतीयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

भारतीयांचा हिस्सा ७० टक्के!

आकडेवारीचा विचार करता अमेरिकेकडून इतर देशांमधून अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या विदेशी नागरिकांना दिल्या जाणाऱ्या H-1b व्हिसांपैकी तब्बल ७० टक्के व्हिसा भारतीयांना दिले जातात. २०२४ च्या USCIS अहवालामध्ये यासंदर्भातले आकडे देण्यात आले आहेत. नोकरीसाठी अमेरिकेत जाण्यासाठी भारतीय तरुणांना हा व्हिसा एक सर्वात महत्त्वाचा मार्ग ठरला आहे. एम्प्लॉयर स्पॉन्सरशिपसाठी अर्ज करण्याआधी प्रामुख्याने Optional Practical Training अर्थात OPT चा पर्याय भारतीयांकडून निवडला जातो.