अमेरिकेकडून भारताला २२ प्रीडेटर गार्डियन ड्रोन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकन सरकारच्या परराष्ट्र विभागाने ड्रोन निर्यात करण्यासाठी आवश्यक परवाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. मोदी-ट्रम्प यांच्या भेटीनंतर काही दिवसांमध्येच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारताला ड्रोन निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने डीएसपी-५ गार्डियन निर्याच परवाने जारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डीएसपी-५ श्रेणी परवाना सैन्य साहित्याच्या निर्यातीसाठी जारी करण्यात आला आहे. गार्डियन ड्रोनमध्ये हिंदी महासागरातील हालचाली टिपण्यास भारतीय सैन्याला मदत होणार आहे. त्यामुळे हिंदी महासागरातील शत्रू सैन्याच्या हालचालींवर करडी नजर ठेवणे भारताला शक्य होणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मागील आठवड्यात अमेरिकेत भेट झाली होती. यावेळी संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक सहकार्य करण्याचा संकल्प करण्यात आला होता. शत्रू सैन्यावर नजर ठेवू शकणारे गार्डियन ड्रोन भारताला देण्यास यावेळी अमेरिकेने संमती दर्शवली होती. याबद्दलच्या प्रस्तावाला अमेरिकेकडून मंजुरी देण्यात आली होती. अमेरिका आणि भारत जवळचे सहकारी देश असल्याने संरक्षण क्षेत्रात एकत्रितपणे काम करणार असल्याचे शिखर संमेलनानंतरच्या संयुक्त निवेदनात जाहीर करण्यात आले होते. भारत आणि अमेरिका संरक्षण साहित्याच्या निर्मितीत एकमेकांच्या सहकार्याने काम करतील, अशी अपेक्षादेखील यावेळी व्यक्त करण्यात आली होती.

संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोडला. ‘भारत आणि अमेरिका यांच्यातील भागिदारीचा भाग म्हणून अमेरिकेने सागरी सुरक्षेशी संबंधित गार्डियन ड्रोनची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारतीय नौदलाची क्षमता वाढेल,’ असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.