तुमच्याकडे आयफोन वा आयपॅड असेल आणि तुम्ही अॅपलच्या अधिकृत अॅप स्टोअरव्यतिरिक्त अन्य कशाहीमधून अॅप्लिकेशन डाऊनलोड करून घेत असाल तर तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. आयफोन/आयपॅडधारकांनी अशा कोणत्याही प्रलोभनांना भुलू नये, असा इशारा कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम-इंडिया (सर्ट-इन) या संस्थेने दिला आहे.
अॅपलच्या आयओएसमध्ये (आय ऑपरेटिंग सिस्टीम) घुसखोरी करून त्यातील माहिती उद्ध्वस्त करणे, महत्त्वाची माहिती चोरी करणे, तसेच आयफोन/आयपॅडधारकाच्या हालचाली टिपणे आदी उपद्रव उद्भवण्याचा धोका असल्याचे सर्ट-इनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या उपद्रवाला ‘मास्क अॅटॅक’ असे नाव देण्यात आले असून त्याची लागण होऊ नये यासाठी आयफोन/आयपॅडधारकांनी इतर कोणत्याही अॅप स्टोअरमधून अॅप्लिकेशन डाऊनलोड न करता केवळ अॅपलच्याच अधिकृत अॅप स्टोअरमधून अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच इतर कोणत्याही वेब-पेजवरून आलेल्या अॅप्लिकेशन इन्स्टॉलवर ‘क्लिक’ न करण्याचे आवाहन सर्ट-इनतर्फे करण्यात आले आहे. अॅप्लिकेशन डाऊनलोड करतेवेळी आयओएसने ‘विश्वासार्ह नसलेला अॅप डेव्हलपर’ असा संदेश दाखवल्यास तातडीने ‘डोन्ट ट्रस्ट’ या पर्यायावर क्लिक करून अॅप्लिकेशन अनइन्स्टॉल करण्याची महत्त्वाची सूचनाही देण्यात आली आहे.

मास्क अॅटॅक म्हणजे..
मास्क अॅटॅक आयफोन/आयपॅड-धारकांच्या थेट आयओएसवरच हल्ला करून पूर्ण सिस्टीमचा कब्जा घेतो. त्यानंतर त्यात साठवण्यात आलेली माहिती उद्ध्वस्त करतो वा तिची चोरी करून उगमकर्त्यांला पाठवतो. आयओएसमधील तांत्रिक दोषांमुळे हा हल्ला होतो.

सर्ट-इन काय आहे?
इंटरनेटवरील हॅकिंग, फिशिंग अशा प्रकारांना आळा घालण्याचे काम सर्ट-इन करते. ही एक मध्यवर्ती संस्था असून भारतातील इंटरनेट डोमेनच्या सुरक्षेशी संबंधित सर्व कामे या संस्थेकडे सोपवण्यात आली आहेत.