US Illegal Immigrants Policy: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर देशातील बेकायदा स्थलांतरितांना परत त्यांच्या देशात पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, जगभरातल्या देशांमधून अमेरिकेत आलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर परत पाठवलं गेलं. अशाच एका ‘परत पाठवणी’च्या वेळचा एक धक्कादायक प्रसंग समोर आला आहे. खुद्द अमेरिकेच्या गृहविभागाच्या सचिव क्रिस्टि नोएम यांनीच हा प्रसंग सांगितला असून त्यामुळे अमेरिकेतल्या स्थलांतरितांचा मुद्दा अधिकच गंभीर झाला आहे. शिवाय, यावेळी नोएम यांनी पुन्हा एकदा फ्लोरिडातील ‘अॅलिगेटर अल्काट्राझ’ मॉडेलचा उल्लेख केला.

काय म्हणाल्या क्रिस्टि नोएम?

क्रिस्टि नोएम मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत फ्लोरिडाच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. बेकायदा स्थलांतरितांचा मुद्दा आणि त्यानिमित्ताने करण्यात आलेली व्यवस्था याचा आढावा घेण्यासाठी फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसँटिस यांची ट्रम्प यांनी भेट घेतली. यावेळी इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट अर्थात ICE च्या काही अधिकाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान या धक्कादायक प्रसंगाबाबत आपल्याला माहिती झाल्याचं क्रिस्टि नोएम यांनी सांगितलं.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, क्रिस्टि नोएम यांना या प्रसंगाबाबत ICE मधील एका मार्शलकडून माहिती मिळाली. बेकायदा स्थलांतरितांना पुन्हा मायदेशी पाठवण्यासंदर्भातील जबाबदाऱ्या हे मार्शल पार पाडत असतात. शिवाय, ज्या विमानांमधून या स्थलांतरितांना नेलं जातं, त्या विमानांमध्येही हे मार्शल असतात. हा प्रसंग नेमका कधी घडला, याविषयी नोएम यांनी माहिती दिली नसली, तरी यामुळे विमानातील अमेरिकन अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसल्याचं त्या म्हणाल्या.

हा स्थलांतरीत Cannibal असल्याचा दावा

संबंधित प्रसंगातील स्थलांतरित कॅनिबल (मनुष्यभक्षक) असल्याचा दावा नोएम यांनी आपल्या प्रतिक्रियेत केला आहे. “मागे एकदा मी ICE च्या पथकातील एका मार्शलशी बोलत होते. त्यांनी मला सांगितलं की त्यांनी बेकायदेशीररीत्या अमेरिकेत राहणाऱ्या एका कॅनिबलला पकडलं आणि त्याला मायदेशी पाठवण्यासाठी विमानात नेलं. जेव्हा ते त्याला विमानात त्याच्या जागेवर बसवत होते, तेव्हा त्याने चक्क स्वत:चेच अवयव खायला सुरुवात केली. परिस्थिती इतकी बिघडली की त्यांना त्याला तातडीने विमानातून खाली उतरवून रुग्णालयात दाखल करावं लागलं”, असं नोएम यांनी माध्यमांना सांगितलं.

“ही अशी माणसं अमेरिकेत शिरत होती”

दरम्यान, नोएम यांनी यासंदर्भात बोलताना माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना लक्ष्य केलं. “माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या स्थलांतरविषयक धोरणांमुळे ही अशी माणसं अमेरिकेत शिरत होती. या मोहिमेत आम्ही खूनी, बलात्कारी, मानवी तस्करी करणारे, अंमली पदार्थांचा व्यापार करणारे यांच्यावर कारवाई करत आहोत. त्यांना या देशाच्या बाहेर पाठवत आहोत”, असं नोएम म्हणाल्या.

“ही माणसं इतकी भयानक आहेत की त्यांना इथे राहण्याचा अधिकारच नाही. आपल्या मुलांसमवेत ही माणसं फिरता कामा नयेत. आपल्या रस्त्यांवर दिसता कामा नयेत. आपल्या कुटुंबांसमवेत एका परिसरात ही माणसं राहता कामा नयेत”, असंही नोएम यांनी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Alligator Alcatraz ची दहशत!

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने बेकायदा स्थलांतरितांसाठी भयानक मगरींचं वास्तव्य असणाऱ्या पाण्याने वेढलेल्या अल्काट्राझमधील तुरुंगाची व्यवस्था केल्याचं अमेरिकन सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या तुरुंगात बेकायदा स्थलांतरितांना ठेवलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या काही दिवसांत ५०० ते १००० व्यक्तींना इथे ठेवता येण्याची व्यवस्था उभारली जाणार आहे. यात टप्प्याटप्प्याने वाढ करत ही क्षमता ५००० पर्यंत नेली जाईल. फ्लोरिडाप्रमाणेच अमेरिकेतील इतर राज्यांनीदेखील अशाच प्रकारच्या व्यवस्था स्थानिक पातळीवर तयार करण्याचं आवाहन नोएम यांनी केलं आहे.