अमेरिकेतील लष्करात तुरबान व दाढीधारी शीखांना काम करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी अमेरिकी काँग्रेसच्या १०५ सदस्यांनी केली आहे. दाढी व तुरबान हा त्यांच्या श्रद्धेचा भाग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री चक हागेल यांना सादर केलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, या शीख सैनिकांनी केलेली कामगिरी लक्षात घेता अमेरिकी शीखांना लष्करात सामावून घेण्यात यावे.
अमेरिकी काँग्रेसचे सदस्य डेमोक्रॅटिक दबाव गटाचे उपाध्यक्ष जो क्रोले, संरक्षण समायोजन उपसमितीचे रॉडनी फ्रेलिंग्युसेन व अमेरिकी प्रतिनिधीगृहाचे १०५ सदस्य यांनी अशी विनंती केली आहे की, शीखांना त्यांची तुरबान व दाढीसह लष्करात सामावून घ्यावे कारण या दोन्ही बाबी त्यांच्या श्रद्धेचा भाग आहेत. शीख पहिल्या महायुद्धापासून अमेरिकी लष्करात काम करीत असून भारत, कॅनडा व इंग्लंड या देशांमध्ये त्यांना लष्करात काम करण्यास परवानगी दिलेली आहे. तीन शीख अमेरिकनांना दाढी व तुरबान नियमात बसेल अशा पद्धतीने ठेवून लष्करात काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तुरबानमुळे त्यांना हेल्मेट, गॅस मास्क ही सुरक्षा साधने वापरता येत नाही ही खरी महत्त्वाची बाब आहे. शीख आघाडीने अमेरिकी काँग्रेस सदस्यांच्या या प्रस्तावाचे स्वागत करताना म्हटले आहे की, काँग्रेस सदस्यांनी शीख अमेरिकनांना लष्करात काम करण्यास परवानगी देण्याबाबत लिहिलेले पत्र हे त्यांना समान संधी देण्यासाठीचा प्रयत्न आहे. शीखांनी आपण उत्तम सैनिक आहोत हे अनेकदा सिद्ध केले आहे व आता तरी पेंटॅगॉन म्हणजे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने त्यांना सैन्यात काम करू द्यावे. तुरबान व दाढी या दोन बाबी त्यात आडकाठी ठरू नयेत असे शीख आघाडीचे कायदा व धोरण संचालक राजदीप सिंग यांनी सांगितले.