इराकमध्ये इसिसच्या कारवाया वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर तेथे पुन्हा पूर्ण स्वरूपाचे आक्रमण करण्याची शक्यता अमेरिकेने फेटाळली आहे.
व्हाईट हाऊसचे प्रसिद्धी सचिव जोश अर्नेस्ट यांनी सांगितले की, इराकवर पूर्ण स्वरूपाचे आक्रमण करण्यास अध्यक्ष बराक ओबामा हे अनुकूल नाहीत. कारण हे धोरण अमेरिकेच्या दीर्घकालीन हिताचे नाही. इराकच्या पायदळाचे सामथ्र्य वाढवण्यातच खरे हित आहे. देशाच्या शत्रूंशी त्यांनाच लढण्यात मदत करण्यामध्ये खरे दीर्घकालीन हित आहे, त्यासाठी इराकला राजकीय नेतृत्वाची गरज आहे. इराक हा बहुपंथीय देश असल्याने तेथे राज्य करण्यासाठी कुशल नेतृत्व हवे. इसिसचा धोका मोडून काढण्यासाठी इराककडे साधनसामुग्री असायला हवी.
इराक व सीरियात स्थानिक सैनिकांची क्षमता इसिस विरोधात लढण्यासाठी वाढवण्यातच अमेरिकेला रस आहे, त्यासाठी त्यांना अमेरिकेचा व एकूणच साठ देशांच्या आघाडीचा पाठिंबा आहे. त्यांना प्रशिक्षण व साधनसामुग्रीच्या माध्यमातून मदत केली जाईल. त्यांना युध्दतंत्रासंबंधी सल्लाही दिला जाऊ शकेल. आमचे काही अधिकारी इराकमध्ये आहेत, ते हे काम करतील. आमच्या हवाईदल शक्तीचाही वापर इसिसविरोधात केला जात आहे, त्यामुळे स्थानिक सैनिकांचे मनोबल उंचावल्याशिवाय राहणार नाही, असे अर्नेस्ट यांनी सांगितले.